पोलिसांनी पेट्रोल टाकून जाळल्याप्रकरणाची चौकशी सीआयडी करणार

पोलिसांचे धक्कादायक आणि अमानुष कृत्य समोर आले आहे. पोलीस कोठडीत एका आरोपीला बेदम मारहाण करून त्याचा खून करण्यात आला. त्यानंतर आरोपीच्या मृतदेहावर पेट्रोल टाकून तो जाळण्यात आला. याप्रकरणी ६ पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक चौकशीसाठी प्रकरण सीआयडीकडं सोपवण्यात आले आहे.

Updated: Nov 8, 2017, 11:19 PM IST
पोलिसांनी पेट्रोल टाकून जाळल्याप्रकरणाची चौकशी सीआयडी करणार title=

सांगली : पोलिसांचे धक्कादायक आणि अमानुष कृत्य समोर आले आहे. पोलीस कोठडीत एका आरोपीला बेदम मारहाण करून त्याचा खून करण्यात आला. त्यानंतर आरोपीच्या मृतदेहावर पेट्रोल टाकून तो जाळण्यात आला. याप्रकरणी ६ पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक चौकशीसाठी प्रकरण सीआयडीकडं सोपवण्यात आले आहे.

जनतेच्या रक्षणासाठी नेमलेले पोलीसच कसे सैतान बनतात, याचं धक्कादायक वास्तव सांगलीतल्या घटनेमुळं समोर आलंय... सांगली शहर पोलिसांनी चोरी प्रकरणी अनिकेत कोथळे आणि अमोल भंडारे या दोघा संशयित आरोपींना अटक केली होती. 

मात्र ते दोघेही रात्रीच्या वेळी पोलीस ठाण्यातून पळून गेल्याचं पोलिसांनी सांगितलं. यामध्ये काहीतरी काळंबेरं असल्याचा संशय अनिकेतच्या नातेवाईकांना आला. त्यांनी मंगळवारपासून पोलीस ठाण्यासमोर आंदोलन सुरू केले. आता या घटनेमागची खरी धक्कादायक माहिती पुढं आलीय.

वास्तविक पाहता हे आरोपी पळून गेले नव्हते. तर पोलीस उप निरीक्षक युवराज कामटे यांनी अनिकेत कोथळेला बेदम मारहाण करून पोलीस ठाण्यातच ठार केले. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे अनिकेतचा मृतदेह कोल्हापूर - रत्नागिरी मार्गावरील आंबा घाटात नेण्यात आला. तिथं पेट्रोल ओतून मृतदेह जाळून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. त्यानंतर आरोपी पळून गेल्याचा बनाव करण्यात आला.

या अमानुष कटाचा मुख्य सूत्रधार पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे याच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला निलंबित करण्यात आले आहे. त्याच्यासह हेड कॉन्स्टेबल अरुण टोने, अनिल लाड, सूरज मुल्ला, पोलीस राहुल शिंगटे आणि झिरो झाकीर अशा सहा पोलिसांना अटक करण्यात आली आहे. या

गुन्ह्यातल्या दोषी पोलिसांना अजिबात पाठीशी घालणार नाही, अशी ग्वाही विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिली आहे. सांगलीतल्या या घटनेमुळं खाकी वर्दीवर पुन्हा एकदा डाग लागलाय. कायद्याचे रक्षकच असे वागू लागले तर समाजातल्या अपप्रवृत्तींना आळा कोण घालणार, असा सवाल आता केला जात आहे.