मुंबई : राज्य विधी मंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विविध मुद्द्यांवर महाविकास आघाडी (mavikas aghadi) सरकारला घेरण्यासाठी भारतीय जनता (bjp) पक्षातर्फे जोरदार मोर्चेबांधनी सुरू आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (pravin darekar) यांनी सत्ताधारी पक्षाच्या आणखी एका आमदारावर गंभीर आरोप केला आहे. राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे (dhananjay munde), शिवसेनेचे मंत्री आणि आमदार संजय राठोड(sanjay rathod) यांच्या नंतर विरोधकांच्या निशाण्यावर कोण आहेत असा प्रश्न जनतेला पडला आहे.
गेल्या काही दिवसांपासून कलाकार रेणू शर्मा कथित बलात्कार प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री धनंजय मुंडे अडचणीत आले होते. याप्रकरणी राज्यातील बड्या नेत्यांनाही प्रतिक्रीया देणे भाग पडले होते. धनंजय मुंडे यांचे प्रकरण निवळल्यानंतर टीकटॉकस्टार पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी (pooja chavhan sucide case) शिवसेनेचे आमदार आणि मंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला आहे.
आत्महत्येप्रकरणी संजय राठोड यांचे नाव जोडले गेल्याने भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी आक्रमकपणे लावून धरली होती. आता विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडीतील आणखी एका आमदाराचा पर्दाफाश करणार असल्याचा इशारा दिला आहे.
प्रवीण दरेकर यांनी विधीमंडळाबाहेर माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, ' सत्ताधारी पक्षातील एका आमदाराचादेखील पर्दाफाश आज विधीमंडळात करणार आहे. संबधित आमदाराची डीएनए चाचणी करावी अशी मागणी न्यायालयात प्रलंबित आहेत. तथाकथित पत्नी आणि मुलगा यांनीही त्यांच्या डिएनए टेस्ट मागणी केली होती.
परंतू पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नाही. सरकारने या आमदाराची चौकशी करावी. अशी मागणी सभागृहात करणार आहे, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणीदेखील तू मारल्यासारखे कर, तू रडल्यासारखे कर. असे सुरू आहे. त्यामुळे संजय राठोडांचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवला जात नाहीये'.
महाविकास आघाडीचा आणखी कोणता नेता किंवा आमदार भाजपच्या निशाण्यावर आहे. याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. विधीमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला अडचणीत आणण्यासाठी भाजप चांगलाच आक्रमक झालेला सध्या दिसून येत आहे.