सागर गायकवाड, झी मीडिया, नाशिक : देश विज्ञानवादी आणि प्रगतीशील समाज म्हणून वाटचाल करत असला तरी आजही आपल्या देशात पतीच्या निधनानंतर पत्नीचं कुंकू पुसणं, गळ्यातील मंगळसूत्र तोडणं, हातातील बांगड्या फोडणं, पायातली जोडवी काढली जाणं, यासारख्या प्रथांचे पालन केलं जातं.
या अनिष्ट प्रथा बंद करण्याचा निर्धार कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्राम पंचायतीचे ग्रापंचायतीने घेतला. हेरवाड ग्रामपंचायतीने हा ठराव करुन राज्यासमोर आदर्श ठेवला. हा आदर्श घेऊन आता राज्यभरात विधवा प्रथा बंद करण्याचा मोठा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला. हेरवाड ग्रामपंचायतीच्या या ठरावाचे रूपांतर आता शासन निर्णयात झालं आहे.
महाराष्ट्रातलं पहिलं उदाहरण
विधवा प्रथा बंद करण्याचा शासन निर्णय आल्यानंतर महाराष्ट्रातील पहिलं उदाहरण समोर आलं आहे. नाशिकमधील सुगंधाबाई चांदगुडे यांनी पतीच्या निधनानंतर तब्बल तेरा वर्षांनी पायात जोडवे घातले आणि कपाळाला कुंकू लावलं.
सुगंधाबाई चांदगुडे कोण?
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत जात पंचायत विरोधी चळवळ उभारणारे नाशिकच्या इंदिरानगर इथे राहणारे कृष्णा चांदगुडे यांच्या 76 वर्षे आईने परंपरेची ही चौकट तोडली आहे. कृष्णा चांदगुडे हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावचे रहिवाशी आहेत. त्यांचे वडील त्र्यंबकराव चांदगुडे हे शेतकरी होते.
तेरा वर्षांपूर्वी हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांच निधन झालं. त्यानंतर त्यांच्या पत्नी सुगंधाबाई यांनी जोडवे घातलेले नाहीत, की कुंकू लावलं नाही.
कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा महिलांचा एक ठराव संमत केल्यानंतर महिलेच्या पतीच्या निधनानंतर बांगड्या फोडणे जोडवे आणि अलंकार काढून घेणे यासारख्या प्रथा बंदीचा ठराव केला. यावर शासन निर्णय आल्यानंतर कृष्णा चांदगुडे यांनी आपल्या विधवा आईला जोडावे घातले, कुंकू लावलं आणि मंगळसूत्रही घालायला दिलं.
परिवर्तन आपल्या घरातून झालं पाहिजे, यामुळे आपण हे पाऊल उचलल्याचं कृष्णा चांदगुडे हे अभिमानाने सांगतात.
समाजातील अनिष्ठ प्रथा थांबविण्यासाठी माझा मुलगा अंधश्रद्धा निर्मुलनाचे काम करतो. आमच्या घरात आम्ही अनेक सुधारणावादी निर्णय घेतले आहेत.आपल्या घरातून त्याची सुरुवात करावी म्हणजे समाजात चांगला संदेश जातो. विधवा असल्याने दुय्यम दर्जाची वागणुक मिळत होती. पण आज आनंद होत आहे आणि अशा प्रकारचा आदर्श सर्वानी घ्यावा आणि समाजात परिवर्तन आणावं अस मतं सुगंधाबाई त्र्यंबक चांदगुडे व्यक्त करतात.
शासनाने परिपत्रक काढल्यानंतर कृष्णा चांदगुडे यांनी आपल्या विधवा आईला ते परिपत्रक दाखवलं. यावर सुगंधाबाई चांदगुडे यांनी सुधारणावाद स्विकारला. सुगंधाबाई यांनी घेतलेल्या या निर्णयाची पूर्ण नाशिकसह राज्यात चर्चा होत आहे.