sharad pawar and ajit pawar : शरद पवार आणि अतित पवार असे राष्ट्रावदीचे दोन गड पडले आहेत. अजित पवार यांच्या गट शिंदे फडणवीस सरकारसोबत सत्तेत सहभागी झाला आहे. तर, शरद पवार यांचा एक गट महाविकास आदघाडीसोबत विरोधात आहे. असे असताना राष्ट्रवादीत नाट्यमय घडामोडी घडत आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांच्या पुण्यातील गुप्त भेटीनंतर दोन्ही गटाच्या नेत्यांकडून करण्यात येत असलेल्या वक्तव्यांमुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.
आमच्यावर शरद पवारांचा आशीर्वाद आहे असं विधान अजित पवार गटाचे बडे नेते असलेल्या प्रफुल्ल पटेल यांनी केले आहे. तर, राष्ट्रवादीत फूट पडली नाही. सर्वजणं पवारांसाठीच काम करत असल्याच्या वक्तव्य शरद पवार गटासोबत असलेले राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केले आहे. राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांच्या या वक्तव्यामुंळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
2 जुलै 2023 रोजी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला. अजित पवार यांचा मोठा गट शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाला. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली आहे. शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट राष्ट्रवादीत पडले आहेत.
शरद पवार बरोबर आले नाहीत तरी ठाकरे गट आणि काँग्रेस एकत्र राहण्याचा विचार करतंय. शरद पवार आणि अजित पवार भेटींवर ठाकरे गट आणि काँग्रेस दोघांनीही नाराजी व्यक्त केलीय. पवारांच्या या भेटींमुळे संभ्रमावस्था आहे. एकीकडे इंडियाची बैठक मुंबईत होत असताना दुसरीकडे शरद पवारांच्या अजित पवारांशी गाठीभेटी होत असल्यानं महाविकास आघाडीमध्ये नाराजी आहे. त्यामुळे शरद पवार गटानं सोबत राहण्याबाबत वेगळी भूमिका घेतली तरी ठाकरे गट आणि काँग्रेस एकत्र राहण्याचा विचार करत असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात राजकीय टोलेबाजी जोरदार सुरू झालीय.
पवार काका पुतण्याच्या भेटींवर काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केलीय. या भेटी हा चिंतेचा विषय आहे. लपून होणा-या भेटी योग्य नाहीत अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलीय. तर पुतण्याने काकांना भेटण्यात गैर काय असा सवाल अजित पवारांनी केलाय. मी लपून फिरणारा माणूस नाही असंही ते म्हणाले.
महाविकास आघाडीमध्ये अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर संभ्रम आहे, अनेक नेते नाराजी व्यक्त करतायत. अशातच विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. महाविकास आघाडीत कुठलाही संभ्रम नसल्याचं त्यांनी म्हटलंय.