Bachchu Kadu Big Claim: शिंदे सरकार अडचणीत? बच्चू कडूंच्या दाव्याने खळबळ

महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government) सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची (Budget Session) तयारी करत असताना दुसरीकडे सत्तेत सहभागी अपक्ष आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी मोठा दावा केला आहे. बच्चू कडू यांनी आमदार फुटणार असल्याचा दावा केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. 

Updated: Feb 9, 2023, 06:37 PM IST
Bachchu Kadu Big Claim: शिंदे सरकार अडचणीत? बच्चू कडूंच्या दाव्याने खळबळ  title=

Bachchu Kadu Big Claim: 27 फेब्रुवारीपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर होणारं हे पहिलंच अधिवेशन असून यावेळी विरोधक शिंदे सरकारची कोंडी करण्याच्या प्रयत्नात असेल. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस 9 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहे. दरम्यान अधिवेशनापूर्वीच राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. प्रहार संघटनेचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या दाव्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. 

अधिवेशनापूर्वी मोठी उलथापालथ होणार असून ठाकरे गट वगळता इतर पक्षातील 10 ते 15 आमदार फुटतील असा खळबळजनक दावा आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. बच्चू कडू यांच्या दाव्यानंतर एकच खळबळ माजली आहे. मात्र यावेळी त्यांनी शिंदे गाटातील 20 ते 25 आमदार इकडे तिकडे झाले तरी सरकार मजबूतीने पूर्ण काळ टिकेल असाही दावा बच्चू कडू यांनी केला आहे. 

पक्षप्रवेश आणि न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांमुळे मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख नेहमी पुढे जात आहे. मात्र पुढील 15 दिवसात अधिवेशनाच्या आधी मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होईल असे सूचक वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे. 

"मला गुवाहाटीहून परत यायचं होतं"

“राजकुमार म्हणून आमचे एक आमदार आहेत, ते सर्वात आधी गुवाहाटीला गेले आणि नंतर मी गेलो. भेटून परत यायचं असं माझं ठरलं होतं. मी सोबत आहे इतकं सांगून मला परत यायचं होतं. मला तिथे थांबायचं नव्हतं. पण ती वेळच तशी होती की, आलेला माणूस जाऊ द्यायचा नाही. ते करावं लागतं, त्यात काही चुकीचं नाही. आम्हीदेखील नगरसेवकांना थांबवूनच ठेवतो,” असा खुलासा बच्चू कडू यांनी एका मुलाखतीत केला होता.

27 फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन

27 फेब्रुवारीपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे 9 तारखेला राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. विधान भवनात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्य विधिमंडळ कामकाज समितीची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, छगन भुजबळ यांच्यासह अनेक नेते बैठकीला उपस्थित होते. 

यावेळी महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारी ते २५ मार्च दरम्यान आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. एकूण चार आठवडे अधिवेशन चालणार आहे. 9 मार्चला अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्प सादर करतील.