नाशकात पंतप्रधान मोदींची सभा, कडेकोट बंदोबस्ताने परिसराला छावणीचे स्वरूप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येथे सभा होणार आहे.  सभास्थळी कडेकोट बंदोबस्त तैनात.

Updated: Sep 19, 2019, 11:04 AM IST
नाशकात पंतप्रधान मोदींची सभा, कडेकोट बंदोबस्ताने परिसराला छावणीचे स्वरूप title=

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येथे सभा होणार आहे. या सभेसाठी शहरात आणि सभास्थळी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंदोलन आणि निषेधाच्या पार्श्‍वभूमीवर अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर सभास्थळी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या सह कांद्यालाही बंदी करण्यात आली आहे. दरम्यान, मोदी यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर तपोवनातील सभेचा परिसर बुधवारीच एनएसजी कंमांडोंनी ताब्यात घेतला असून, संपूर्ण परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे.

राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी भाजपकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. मोदींच्या सभेची तयारी पूर्ण झाली आहे. या जाहीर सभेच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या सभेसाठी सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. कांदा फेकून निषेध होऊ शकतो, अशी शक्यता असल्याने पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. तसेच पिण्याच्या बाटल्यांनाही परवानगी नाकारण्यात आली आहे. नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरेपाटील यांनी याबात तशी माहिती दिली आहे.