Dr Priyanka Kamble : महिलांचे आयुष्य चुल आणि मुलं इथपर्यंत मर्यादित न राहता महिलांनी उत्तुंग भरारी घेत पुरुषांच्या बरोबरीने आपलं वेगळ जग निर्माण केले आहे. समाजात अगदी बिनधास्तपणे वावरणाऱ्या प्रत्येक महिलेच्या आयुष्यात एक गोष्ट अशी जी तिच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे ती म्हणजे मासिक पाळी. मासिक पाळीबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली असली तर अनेक महिला या विषयावर उघडपणे बोलणं टाळतात. मासिक पाळी ही प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील अत्यंत पर्सनल बाब आहे. यामुळे अनेकदा अनेक प्रश्न महिलांच्या मनात तसेच राहतात. ग्रामीण भागात अद्यापही मासिक पाळीबाबत महिलांच्या मनात अनेक प्रश्न आणि गैरसमज आहे. मासिक पाळी याच विषयावर डॉक्टर प्रियंका कांबळे या तरुणीने तब्बल 1111 लेक्चर दिले आहेत. प्रियकांने अनोखा विश्वविक्रम रचला आहे.
डॉक्टर प्रियंका कांबळे... प्रियंकाला डॉक्टर ही पदवी मेडिकल शिक्षण घेवून नाही तर तिच्या अनोख्या कार्यामुळे तिला ही पदवी मिळलाी आहे. प्रियंका गेली अनेक वर्ष मासिक पाळी या विषयावर काम करत आहे. आदिवासी पाडे, दुर्गम गावे... महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन प्रियंका मासिक पाळी या विषयावर जनजागृती करते. प्रियंकाने मासिक पाळी या विषयावर तब्बल 1111 लेक्चर दिले आहेत. प्रियंकाच्या या अनोख्या कार्याची थेट जागतित पातळीवर दखल घेण्यात आली आहे. मासिक पाळी या विषयावर 1111 सत्र पूर्ण केल्याबद्दल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड लंडन मध्ये तिच्या नावाची नोंद झाली आहे.
मासिक पाळी हा विषय सध्या सर्वसामान्य वाटत असला तरी अद्याप या विषयावर उघडपणे बोलले जात नाही. अनेक ठिकाणी अद्याप याबाबत अनेक गैरसमज आहेत. मासिक पाळी दरम्यान महिलांना अनेक अडचणी येतात. ग्रामीण भागात तर परिस्थिती फार भयानक आहे. अनेक महिलांना सॅनिटरी पॅड कसे वापरावे हे देखील माहित नसते. ग्रामीण भागात महिलांना सॅनेटिरी पॅड सहज उपलब्ध होत नाही. प्रियंका याच विषयावर जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढत आहे. सतराशे ते अठराशे किलोमीटरचा प्रवास... महाराष्ट्रातले अनेक जिल्हे पार करत विविध ठिकाणी लेक्चर घेते. प्रियंका फक्त जग जागृतीच करत नाही तर महिलांना बोलतं देखील करते. यामुळेच लेक्चर संपल्यानंतर खास एक तास प्रश्न विचारण्यासाठी असतो. लेक्चर असल्यानंतर मुली तसेच महिला असंख्य प्रश्न विचारतात. अद्यापही मासिक पाळी या विषयाबाबत अज्ञान असल्याचे प्रियंका सांगते. ग्रामीण भागत लेक्चरसाठी गेल्यावर प्रियंका सोबत मोठ्या प्रमाणात सॅनेटरी पॅड घेवून जाते. लेक्चर संपल्यानंतर प्रियंका मुलींना आणि महिलांना सॅनेटरी पॅडचे वाटप करते तसेच याच्या वापराबाबत देखील माहिती देते.
प्रियंका वर्ल्ड ह्युमन राईट्स कमिशनची नॅशनल मेंबर आहे. आदिवासी पाड्यातील महिलांसाठी ती काम करते. व्हिएतनाम येथे यू एन तर्फे झालेल्या women कॉन्फरन्स मध्ये निवड झाली होती. international model United Nations मध्ये UNwomen मधून महिलांच्या समस्या, स्त्री पुरुष समानता यावर चर्चा तसेच प्रॅक्टिकल सोल्यूशन काढणे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांच्या समस्या मांडण्याची संधी प्रियंकाला मिळाली होती.