मुंबई : नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून पेटलेलं आंदोलन राज्यातही दाखल झालं आहे. नागपूरातल्या या आंदोलनात हजारो नागरिक रस्त्यावर उतरले होते. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात रोष व्यक्त करत आंदोलकांनी प्रचंड घोषणाबाजी केली.
औरंगाबादमध्ये नागरिकत्व कायदा आणि एनआरसी कायद्याच्या विरोधात आंदोलन छेडण्यात आलं. मोर्चाला हजारो मुस्लीम बांधवांची गर्दी दिसून आली. आझाद चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय असा हा धडक मोर्चा निघाला. आंबेडकरी संघटनांचा सुद्धा या मोर्चात सहभाग होता. दिल्ली गेट जवळ मोर्चाचं सभेत रूपांतर झालं.
सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात पुण्यातही मोर्चा काढण्यात आला. उलमा ए किरामच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. बाबा जान चौकातून दर्ग्यात नमाज पठण झाल्यानंतर या मोर्चाला सुरुवात झाली. कॅम्प मधील आंबेडकर पुतळा मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीमध्ये बंदची हाक देण्यात आली. अज्ञातांनी एसटीवर दगडफेक करून काचा फोडल्या, कळमनुरी बस स्थानकातुन सोलवाडीकडे ही बस निघाली असतांना दगडफेक झाली, यात दोन प्रवासी जखमी झाले.
सांगली जिल्ह्यातल्या मिरजेत CAA आणि NRC कायद्याच्या विरोधात सर्वधर्मीय बांधवांनी संविधान बचाव मोर्चा काढला. सांगली जिल्ह्यातील 15 हजार लोक या मोर्चात सहभागी झाले होते. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मिरज शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
सुधारित नागरिकत्व कायद्याविरूद्ध विविध संघटनांनी एकत्र येत अंबरनाथमध्येही भव्य मोर्चा काढला. यावेळी हजारोच्या संख्येने नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. अंबरनाथ मस्जिद ट्रस्टच्या वतीने या निषेध मोर्च्याचं आयोजन करण्यात आलं होतं.