पुलवामा दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद, एकाचा अपघाती मृत्यू

महाराष्ट्रानं एकाच दिवशी आपल्या तीन सुपुत्रांना गमावलंय. यातील दोघांना पुलवामा दहशतवादी हल्ल्यात हौतात्म्य आलंय...

शुभांगी पालवे | Updated: Feb 15, 2019, 01:38 PM IST
पुलवामा दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद, एकाचा अपघाती मृत्यू  title=

नितेश महाजन / मयुर निकम, झी मीडिया, बुलडाणा : जम्मू - काश्मीरच्या पुलवामातल्या अवंतीपोरा (Awantipora) भागाजवळ गोरीपोरामध्ये आत्तापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी आत्मघातकी हल्ला घडवून आणण्यात आला. सीआरपीएफ (CRPF) च्या वाहनांना लक्ष्य करत आयईडी स्फोटकांच्या साहाय्यानं हा हल्ला घडवून आणण्यात आला. हल्ला झाला तेव्हा सीआरपीएफ जवानांचा ताफा जम्मूहून श्रीनगरकडे जात होता. न्यूज एजन्सी राऊटर्सनं (Reuters) दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात आत्तापर्यंत ४४ जवानांचा मृत्यू झालाय. याच हल्यातील शहिदांमध्ये महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांचा समावेश असल्याची माहिती हाती येतेय. हे दोन्ही शहीद बुलडाणा जिल्ह्यातील असून नितीन राठोड आणि संजय राजपूत अशी त्यांची नावं आहेत.

बुलडाणा जिल्ह्यातील नितीन राठोड शहीद

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातल्या चोरपांगरा गावचे रहिवासी असलेले नितीन शिवाजी राठोड हे या हल्ल्यात शहीद झालेत. नितीन राठोड यांच्या पश्चात पत्नी वंदना राठोड, मुलगा जीवन, मुलगी जीविका, आई सावित्रीबाई राठोड, वडील शिवाजी राठोड, भाऊ प्रवीण आणि दोन बहिणी असा परिवार आहे.  


शहीद नितीन राठोड 

नितीन राठोड शहीद झाल्याचं समजताच संपूर्ण कुटुंबाला आणि गावालाच धक्का बसला. स्थानिकांनी राठोड यांच्या घरासमोर गर्दी केलीय. दहशतवादी हल्ल्यात नितीन राठोड शहीद झाल्याचं समजताच त्यांच्या चोरपांगरा गावासहीत सगळ्या महाराष्ट्रावरच शोककळा पसरली आहे. 

बुलडाण्याचे संजय राजपूत शहीद

पुलवामातल्या याच आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राचा आणखी एक सुपुत्र संजय राजपूत हेदेखील बळी पडलेत. कश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले संजय राजपूत हे बुलडाणा जिल्ह्याचे रहिवासी आहेत. संजय राजपूत यांचं कुटुंबीय बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर इथल्या लखानी प्लॉट इथे राहतात.


शहीद संजय राजपूत

मलकापूरमधील ४९ वर्षीय संजय राजपूत हे सीआरपीएफ बटालियन ११५ मध्ये कार्यरत होते.  त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुलं तसंच चार भाऊ आणि एक बहीण असं कुटुंब आहे. वयाच्या २३ व्या वर्षी नागपूरहून सीआरपीएफमध्ये नोकरीला लागलेले संजय राजपूत यांची पहिली पोस्टिंग त्रिपुरा येथे होती. शहीद संजय राजपूत यांची सीआरपीएफमध्ये २० वर्ष सेवा झाली. मात्र, देशसेवेसाठी त्यांनी परत पाच वर्ष वाढवून घेतली होती. 

संजय राजपूत शहीद झाल्याचं समजताच मलकापूरवर शोककळा पसरलीय. संजय राजपूत यांना १३ वर्ष आणि १० वर्ष वयाची दोन मुलं आहेत. चार भाऊ आणि एक बहिण अशा भरगच्च कुटुंबात ते मोठे झाले. संजय राजपूत यांच्या एका भावाचा काही महिन्यांपूर्वी अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर आता संजय यांना वीरमरण आल्यामुळे राजपूत परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय.

राहुल कारंडे यांचा अपघाती मृत्यू

गुरुवारी एकाच दिवशी महाराष्ट्रानं आपल्या तीन सुपुत्रांना गमावलंय. याच दिवशी सांगली जिल्ह्यातील जवान राहुल कारंडे या जवानाचा एका अपघातात मृत्यू झाल्याचं समजतंय. राहुल कारंडे कवठेमडंकाळ इथल्या विठुरायाची वाडी या गावचे रहिवासी होते.  


राहुल कारंडे यांचा अपघाती मृत्यू

याअगोदर राहुल कारंडे ही पुलवामा हल्ल्यात शहीद झाल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र, त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याचं आता स्पष्ट झालंय. जिल्हाधिकाऱ्यांनीही या बातमीला दुजोरा दिलाय. कारंडे यांच्या अपघाती निधनानं विठुरायाची वाडी या त्यांच्या गावावर शोककळा पसरलीय.