Pune Accident : विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू; मदतीसाठी आलेल्या अ‍ॅम्ब्युलन्सनेही घेतला जीव

Pune News: पुणे अहमदनगर महामार्गावर सातत्याने अपघात होत असून अनेकांचा बळी गेला आहे. दोन विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान हा अपघात इतका भीषण होता की, रुग्णवाहिकेचा चुराडा झाला

Updated: Jan 27, 2023, 02:55 PM IST
Pune Accident : विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू; मदतीसाठी आलेल्या अ‍ॅम्ब्युलन्सनेही घेतला जीव  title=

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुणे अहमदनगर महामार्ग (pune ahmednagar highway) प्रवाशांसाठी मृत्युचा सापळा बनत चालला आहे. अशातच महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात दोघांनी जीव गमावला आहे तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. पुण्यातील (Pune Accident) कोरेगाव भीमा (bhima koregaon) येथील वाडा पुनर्वसन फाट्याजवळ हा अपघात झाला. स्विफ्ट डिझायर आणि बाईकच्या धडकेत झालेल्या अपघातामध्ये एका युवकाचा मृत्यू झाला. त्यानंतर अपघाताची माहिती मिळताच जखमींना मदत पोहचवण्यासाठी येत असलेल्या रुग्णवाहिकेला (ambulance) अपघात झाला आणि यामध्ये आणखी एका तरुणाचा मृत्यू झाला.

भीमा कोरेगाव येथील वाडा पुनर्वसन फाट्यावरील छत्रपती ऑटो गॅरेज समोर महेश राजाराम गव्हाणे हे दुचाकीवरुन जात होते. त्यावेळी अहमदनगरकडून येणाऱ्या शंकरसन श्रीनरहरी राऊत (रा.लोहगाव पुणे)  यांचे स्विफ्ट डिझायर (एम एच १२ एस बाय १९९०) या गाडीवरील नियंत्रण सुटले. गाडीने गव्हाणे यांच्या दुचाकीला धडक दिल्याने गंभीर अपघातात झाला. हा अपघात इतकी भीषण होता की त्यामुळे महेश गव्हाणे यांचा जागीच मृत्यू झाला.

 महेश गव्हाणे यांच्या अपघाताची माहिती मिळताच मदतीसाठी रुग्णवाहिकेला बोलवण्यात आले. मात्र मदतीसाठी येणाऱ्या रुग्णवाहिकेला सणसवाडी गावच्या हद्दीत वजन काटयाजवळ अपघात झाला. रुग्णवाहिकेचा चालक  वैभव गजानन डोईफोडे (रा.बजरंगवाडी, शिकापुर, ता.शिरूर) याचेही गाडीवरील नियंत्रण सुटले. रुग्णवाहिकेने दुचाकीवरुन येणाऱ्या श्रीकांत सुर्यकांत उबाळे याला जोरदार धडक दिली. या धडकेत श्रीकांतचा मृत्यू झाला. तर रुग्णवाहिकेतील चालकाच्या शेजारी बसलेल्या अक्षय रविंद्र बनसोडे याला गंभीर दुखापत झाली.

दरम्यान, याआधीही पुणे - अहमदनगर महामार्गावर झालेल्या भीषण अपघात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला होता. पहाटे रस्त्याच्या कडेला चुकीच्या बाजूने येणाऱ्या कंटेनरने कारला धडक दिल्याने तीन मुलांसह एकाच कुटुंबातील पाच जणांना जीव गमवावा लागला.

पुणे-अहमदनगर महामार्गावरील रांजणगावजवळ पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला होता. कारमधून एकाच कुटुंबातील सहा जण पुण्याला जात होते. कारेगावजवळ  चुकीच्या दिशेने येणाऱ्या कंटेनरने त्यांच्या वाहनाला धडक दिली होती. या अपघातात कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला, तर एक महिला जखमी झाली. मृतांमध्ये चार वर्षांच्या मुलीसह तीन मुलांचा समावेश होता.