हेमंत चापुडे, झी मिडिया, पुणे : लग्न म्हटलं की दोन कुटुंबांना एकत्र आणून सुखी संसाराची स्वप्न नवरा मुलगी पहात असतात. पण याला असलेली कायद्याची चौकट पायदळी तुडवण्याचा गंभीर प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. पुण्यातील लोणीकंद बुर्केगाव येथे पंधरा वर्षीय मुलीला विवाह बंधनात अडकविल्याने परिसरात संतापाची लाट आहे. याप्रकरणी दोन्ही कुटुंबातील चार सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून नवरदेव मुलाला पोलिसांनी अटक केली. मुलामुलीच्या इतर नातेवाईकांचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
मुलीच्या इच्छेविना दोन्ही कुटुंबातील नातेवाईकांनी बळजबरीने मुलीला लग्नमंडपातील बोहल्यावर चढविल्याचे वृत्त समोर येत आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समिती आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या मदतीने लोणीकंद पोलीस स्थानकात यासंदर्भातील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व धक्कादायक प्रकारानंतर पोलिसांनी मुलीची सुटका करून मुलीची रवानगी माहेर संस्थेत केली आहे.
मुलाचे वय २१ तर मुलीचे १८ वर्षे पुर्ण झाल्यानंतरच विवाह कायद्यानुसार मान्य केला जातो. मात्र सध्या अनेक ठिकाणी हा कायदा पायदळी तुडवला जात असून संसार उभे केल्याच्या घटना समोर येत आहेत. देश महासत्ता होण्याकडे वाटचाल करत असताना आजही समाजात अंधश्रद्धा पसरून लग्नाचे घाट घातले जातात.
मात्र असे बालवयात विवाह केल्याने नव दांपत्याच्या पुढील आयुष्याचे काय ? हाच गंभीर प्रश्न या निमित्ताने प्रश्न उपस्थित होतोय.