गँगस्टर.. विषय करायचा नाय ताईने केला राडा! अल्पवयीन मुलींची मारहाण, प्रसिद्धीसाठी Video केला व्हायरल

सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी काही मुलींनी एका अल्पवयीन मुलीला मारहाण केली. आपली दहशत निर्माण व्हावी यासाठी त्यांनी व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला.

Updated: Apr 18, 2023, 06:55 PM IST
गँगस्टर.. विषय करायचा नाय ताईने केला राडा! अल्पवयीन मुलींची मारहाण, प्रसिद्धीसाठी Video केला व्हायरल title=

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : चित्रपटात शोभेल अशा पद्धतीने भर चौकात शाळकरी मुलींना एका मुलीला मारहाण केली. त्या इतक्यावरच थांबल्या नाहीत तर मारहाणीचा व्हिडिओ (Video) मोबाईलमध्ये चित्रित करत तो सोशल मीडियावर व्हायरल केला. प्रसिद्धी मिळवणं आणि आपली दहशत निर्माण व्हावी या उद्देशाने या मुलींनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. 'राडा....कंपनी...गँगस्टर.. विषय करायचा नाय ताई' असे भाईगिरीचे कॅप्शनही या व्हिडिओला दिले.

काय आहे नेमकी घटना
पुण्यातील कोथरूड (Pune Kothrud) परिसरात अल्पवयीन मुलींने भर चौकात एका शाळकरी मुलीवर हल्ला केला. तिला केसांनी ओढत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. या मारहाणीचा व्हिडिओ त्यांनी तयार केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला. ज्या मुलीला मारहाण करण्यात आली ती मुलगी दिव्यांग होती. मारहाण झाल्याने ती मुलगी प्रचंड घाबरली. भेदरलेल्या अवस्थेत घरी आलेल्य मुलीला पाहून आई-वडिलांना धक्का बसला. याबाबत पालकांनी विचारल्यावर मुलीने घडलेला सर्व प्रकार सांगितला.

मुलींनी बनवली होती टोळी
धक्कादायक म्हणजे मारहाण करणाऱ्या मुलींनी आपली टोळी बनवली होती.  एकत्रितपणे विविध ठिकाणांना भेटी देणे, वाढदिवस साजरे करणे, रील्स बनवणे, समाजमाध्यमावर फॉलोअर्स वाढवणे हे त्यांचे काम गैरसमजुतीतून या दिव्यांग मुलीला मारहाण केल्याचे त्यांनी सांगितलं. मारहाणीचा व्हिडिओ करुन आपली इमेज बनवण्यासाठी तो व्हिडिओ शेअर केला. मारहाण झालेल्या मुलीच्या पालकांनी तक्रार केल्यानंतर मुलींना ताब्यात घेण्यात आलं त्यानंतर त्यांचं समुपदेशन करुन त्यांना सोडून दिलं.

फॉलोअर्स वाढवण्यासाठी काही पण...
सोशल मीडियावर आपले फॉलोअर्स वाढावेत म्हणून अनेक तरुण-तरुणी अशा प्रकारचे व्हिडिओ तयार करतात. धमकीवजा अश्लील भाषेचा वापर करून व्हिडिओ बनवायचे आणि ते  सोशल मीडियावर व्हायरल करायचे. यातून समाजस्वास्थ्य बिघडविण्याचे कृत्य केले जात आहे. पुण्यात अशा प्रकारच्या अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. धक्कादायक म्हणजे सोशल मीडियावर अनेकजण त्यांना फॉलो करतात. त्यामुळे ही वृत्ती जागीच ठेचुन काढण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.