पुण्यात गोळीबाराचा थरार! राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकावर फायरिंग, नाना पेठ परिसरात खळबळ

Attack On Vanraj Andekar in Pune : पुण्यातील नाना पेठेत राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली.

सौरभ तळेकर | Updated: Sep 2, 2024, 12:06 AM IST
पुण्यात गोळीबाराचा थरार! राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकावर फायरिंग, नाना पेठ परिसरात खळबळ title=
vanraj andekar shot in Nana Pethe

Pune Crime News : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. नाना पेठ परिसरात ही धक्कादायक घटना घडली. यामध्ये वनराज आंदेकर यांच्यावर 5 राउंड फायर करून कोयत्याने वार देखील करण्यात आलेत. गोळीबार केल्यानंतर आरोपी फारार झाले आहेत, तर पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. दरम्यान, या गोळीबारात आंदेकर गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 

गोळीबाराच्या घटनेपूर्वी डोके तालीम परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास नाना पेठेतील डोके तालीम परिसरात थांबले असताना ही धक्कादायक घटना घडली.  हल्लेखोराने पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडल्याची माहिती समोर आली आहे. गोळीबारानंतर वनराज आंदेकर यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. गणेशोत्सवाच्या तोंडावर माजी नगरसेवकावर गोळीबार करण्यात आल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.

शरद मोहोळ हत्या प्रकरणानंतर वनराज आंदेकर यांच्यावर झालेल्या घटनेनंतर पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक उरलाय की नाही? असा सवाल देखील विचारला जाऊ लागलाय. कौटुंबिक वाद तसेच वर्चस्वाच्या वादातून गोळीबार झाल्याचं मानलं जातंय. नाना पेठेत आंदेकर टोळीचा दबदबा असल्याने हे टोळीयुद्ध तर नाही ना? असा सवाल पुन्हा विचारला जाऊ लागलाय.