केक घेतला नाही म्हणून घरात घुसला अन्... एकतर्फी प्रेमातून तरुणाचं धक्कादायक कृत्य

Pune Crime : पुण्यात एकतर्फी प्रेमातून तरुणाने एका तरुणीवर हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरु केला आहे. या सगळ्या प्रकारामुळे परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे.

आकाश नेटके | Updated: Aug 26, 2023, 11:52 AM IST
केक घेतला नाही म्हणून घरात घुसला अन्... एकतर्फी प्रेमातून तरुणाचं धक्कादायक कृत्य title=

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या एका तरुणाने तरुणीवर हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात (Pune Crime) समोर आला आहे. तरुणीच्या वाढदिवसानिमित्त आरोपी तरुणाने तिच्या घरी केक पाठवला होता. मात्र तो केक तिने न स्वीकारल्याने आरोपीने तिच्या सोसायटीतील सुरक्षारक्षकांसोबत वाद घातला आणि जबरदस्तीने या तरुणीच्या घरात प्रवेश केला. घरात प्रवेश करून या तरुणाने तरुणीवर हल्ल्याचा देखील प्रयत्न केलाय. कोंढवा पोलीस ठाण्याच्या (Pune Police) हद्दीतील एका उच्चभ्रू सोसायटीत 24 ऑगस्टच्या रात्री हा संपूर्ण प्रकार घडला. 

कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी अंकित सिंग (वय 31) या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीस वर्षीय तरुणीने या प्रकरणी तक्रार दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या सगळ्या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपींनी फिर्यादीला अनेक वेळा माझे तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणत तुझ्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र फिर्यादीने त्याला नकार दिला होता. त्याचा नंबर ब्लॉक केला तरी वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून तो संपर्क साधायचा. दरम्यान फिर्यादीचा वाढदिवस असल्याने आरोपीने 24 ऑगस्टच्या रात्री तिच्या घरी कुरिअरने केक पाठवला होता. मात्र फिर्यादीने तो केक घेतला नाही. 

त्यानंतर आरोपीने फिर्यादी तरुणी राहत असलेल्या सोसायटीमध्ये पोहोचला. सोसायटीमध्ये शिरताच तरुणाने सुरक्षारक्षकांसोबत वाद घातला आणि फिर्यादीच्या घरात जबरदस्तीने घुसला. त्यावेळी तरुणाने फिर्यादीला मारहाण करण्याचा देखील प्रयत्न केला. या झटापटीत फिर्यादीच्या अंगावरील कपडे ओढले गेल्याने तिच्या मनाला लज्जा उत्पन्न झाली. या सगळ्या प्रकारानंतर तरुणीने पोलीस ठाणे गाठत आपली तक्रार नोंदवली आहे. कोंढवा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.