पुणे : बांधकाम व्यावसायिक डीएसके यांच्यावर गुंतवणुकदारांचे पैसे थकवल्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. पुणे आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केलीये.
डीएसकेंच्या ७ महागड्या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. ६ चारचाकी आणि एक दुचाकी गाडी पुणे आर्थिक गुन्हे शाखेने जप्त केलीये. या गाड्यांमध्ये २ बीएमडब्ल्यू, २ टोयोटा, १ ऑडी, १ पोर्शे गाडी जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या गाड्यांची किंमत अंदाजे पाऊणेसहा कोटी असल्याचं समजतं. १.७५ कोटींची पोर्शे, २.५ कोटींच्या दोन BMW, ५० लाखांची ऑडी, ६० ते ६२ लाख किंमतीच्या टोयोटा कॅम्ब्री कार आणि ३६ लाखांची दुचाकी जप्त करण्यात आलीये.
पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्यावर चार हजार पंचेचाळीस कोटी रुपयांची देणी असल्याची माहिती आतापर्यंतच्या तपासात पुढे आली आहे. यातील अठ्ठावीसशे ब्यान्नव कोटी रुपये हे विविध बँकांची कर्जे आहेत. तर, अकराशे त्रेपन्न कोटी रुपयांच्या ठेवी आहेत.
डीएसकेंनी वेगवेगळ्या नावांनी ५९ कंपन्या उभारल्या आहेत. त्या मार्फत डीएसकेंनी आर्थिक व्यवहार केले असल्याची माहितीदेखील तपासात पुढे आली आहे. तपास यंत्रणांनी तज्ञामार्फत डीएसकेंच्या व्यवहारांचे ऑडिट करुन ही माहिती मिळवली आहे. सध्या डीएसके यांच्या पत्नी आणि मुलाकडे तपास सुरु आहे. मात्र, तपासात ते सहकार्य करत नसल्याचं पोलिसाचं म्हणणं आहे.