सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यात (Pune Crime) गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरु असलेली कोयत्याची (Koyta Gang) दहशत कमी होताना दिसत नाहीये. दिवसाढवळ्या क्षुल्लक कारणांवरुन कोयत्याने हल्ला करुन दहशत माजवण्याचा प्रकार पु्ण्यातील विविध भागात सुरु आहे. अशातच जमिनीच्या वादातून एका व्यक्तीवर कोयत्याने वार करण्यात आले आहेत. या हल्ल्याक पीडित व्यक्ती गंभीर जखमी झाली असून त्याच्या डोक्याला तब्बल 34 टाके पडले आहेत. पुणे पोलिसांनी (Pune Police) याप्रकरणी तक्रार नोंदवून आरोपींचा शोध सुरु केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार खडकवासला येथील रहिवासी संकेत मते व त्यांच्या भावकीतील इतरांमध्ये वडिलोपार्जित जमिनीवरुन वाद सुरू आहेत. रविवारी दुपारी मते व त्यांच्या घरातील इतर सदस्य कोल्हेवाडी येथील शेतात काम करत होते. त्याचवेळी मते यांच्या भावकीतील काही सदस्य तिथे आले. त्यामध्ये महिला आणि पुरुष दोघेही होते. त्यावेळी झालेल्या शाब्दिक बाचाबाचीतून संकेत मते यांच्या डोक्यात कोयत्याने वार करण्यात आले. या हल्ल्यात मते यांच्या डोक्यावर तीन ते चार वार करण्यात आले आहेत. मते यांना तब्बल 34 टाके पडले आहेत. हवेली पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दखल केला असून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
मोफत सिगारेट दिली नाही म्हणून केले वार
मोफत सिगारेट दिली नाही म्हणून संतप्त झालेल्या इसमाने हॉटेल चालकाला कोयत्याने वार करून गंभीर जखमी केलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी चेतन बसवराज चितापुरे या 22 वर्षाच्या तरुणाला अटक केली आहे. तो पुणे येथील लोहंगावच्या मोझे आळी येथे राहतो. याबाबत हर्षल गुंजाळ यांनी फिर्याद दिली होती. शुक्रवारी पहाटे 4 वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली. त्यावेळी फिर्यादी हॉटेल बंद करुन काम आवरुन हॉटेलच्या बाहेर फोनवर बोलत थांबले होते. त्यावेळी आरोपी त्या ठिकाणी आला. त्याने फिर्यादीकडे मोफत मध्ये सिगारेट मागितली.पण आता हॉटेल बंद झाले असल्याचे फिर्यादीने चेतन चितापुरे याला सांगितले.
मोफत सिगारेट देत नाही नाही याचा राग चेतनला आहे. त्याने हा राग मनात धरुन कंबरेला लावलेले बोथट लोखंडी हत्यार काढले. 'तु मला ओळखले नाही, तू मला सिगारेट देत नाही? थांब तुला दाखवतो. आज तुझा गेम करतो' असे बोलून त्याच्यावर सपासप वार केले.