पूजा खेडकरांना आणखी एक धक्का; आई मनोरमा यांना लॉजमधून अटक! Video भोवला

Pooja Khedkar Mother Arrest:  खासगी गाडीवर लाल दिवा लावल्याने वादात सापडलेल्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या मातोश्रींना पोलिसांनी रायगडमधून ताब्यात घेतल्यानंतर अटक केली आहे. 

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 18, 2024, 12:33 PM IST
पूजा खेडकरांना आणखी एक धक्का; आई मनोरमा यांना लॉजमधून अटक! Video भोवला title=
रायगडमधून घेण्यात आलं ताब्यात

IAS Pooja Khedkar Mother Arrest:  महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण देशामध्ये चर्चेत असलेल्या वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची प्रशिक्षक प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्ती रद्द झाल्यानंतर आता पूजा यांच्या आई मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. काही वेळानंतर मनोरमा यांना अटक करण्यात आल्याचं जाहीर केलं गेलं. मुळशीमधील शेतकऱ्यांना जमीनीच्या वादातून हातात पिस्तुल घेऊन धमकावल्याप्रकरणी पौड पोलिसांना रायगडमधून मनोरमा खेडकर यांना अटक करण्यात आली आहे. महाड येथील हिरकणी वाडीमधील पार्वती हॉटेल (लॉज) मधून पहाटे पुणे ग्रामीण एससीबी पोलिसांनी मनोरमा यांना अटक केली आहे.

पूजा खेडकर यांच्या आई कशा चर्चेत आल्या?

आपल्या ऑडी गाडीवर लाल दिवा लावल्याने चर्चेत आलेल्या पूजा खेडकर यांच्यासंदर्भात मागील काही आठवड्यांपासून नवीन नवीन खुलासे समोर येत आहेत. लाल दिव्याबरोबरच प्रशिक्षणार्थी असताना कार, स्वयीक सहाय्यकाबरोबरच वेगळ्या केबिनसाठी मागणी केल्याचे पूजा यांचे जिल्हाधिकारी कार्यालयातील व्यक्तीबरोबरचे व्हॉट्सअप चॅट समोर आले. त्यातच दिव्यांग म्हणून मिळालेलं प्रमाणपत्रही वादात सापडलं. तसेच वडिलांची संपत्ती 40 कोटींहून अधिक असताना पूजा यांनी नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र कसं मिळालं यासारखे प्रश्न उपस्थित करण्यात आले. असं असतानाच कारवाईसाठी पूजा यांच्या पुण्यातील घरी पोहोचलेल्या पोलिस आणि अधिकाऱ्यांचं वार्तांकन करायला गेलेल्या प्रसारमाध्यम प्रतिनिधींबरोबर पूजाची आई मनोरमा खेडकर यांनी उद्धट वागणूक दिल्याने त्या सुद्धा चर्चेत आल्या. मनोरमा या चर्चेत आल्यानंतर त्याचा एक जुना व्हिडीओ समोर आला. 

काय आहे व्हिडीओमध्ये?

प्रसारमाध्यम प्रतिनिधींना धमकावणाऱ्या मनोरमा खेडकर यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ आठवड्याभरापूर्वी समोर आला. या व्हिडीओमध्ये मनोरमा खेडकर हातात रिव्हॉल्वर आणि सोबत बाउन्सर घेऊन जमिनीसाठी वाद घालत असल्याचं दिसत आहे. या व्हिडीओमध्ये मनोरमा एका शेतकरी कुटुंबाला धमकावत असल्याचं सांगितलं जात आहे. खेडकर कुटुंबानं पुण्यातील मुळशी तालुक्यात 25 एकर जमीन खरेदी केली आहे. त्याच ठिकाणी स्थानिक शेतकऱ्यांबरोबर झालेल्या वादाचा हा व्हिडीओ असल्याचं समजतं. हा संपूर्ण प्रकार 2023 साली 5 जून रोजी घडल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडीओमध्ये मनोरमा खेडकर या बाऊन्सर आणि हातात पिस्तूल घेऊन शेतक-यासोबत वाद घालताना स्पष्टपणे दिसतंय.

मनोरमा खेडकर यात काय म्हणाल्या?

"जागा माझ्या नावावर आहे. मूळ मालक मी आहे. सातबारा माझ्या नावावर आहे. मला आधी कोर्टाचा कागद आणून दाखवायचा," असं मनोरमा हातात पिस्तूल घेऊन वाद घालताना म्हणत आहेत. "मी कोर्टात येणार, काय व्हायचं ते होऊ दे," असं मनोरमा म्हणताना दिसत आहेत. व्हिडीओ शूट करणारा शेतकऱ्यांबरोबरची व्यक्ती, 'मॅडम आपलं कायदेशीर सुरु आहे. तुम्ही आम्हाला का त्रास देताय?' असं विचारतो. त्यावर मनोरमा, "तुम्ही मला कायद्याचं सांगू नका. कायद्याने मला सांगितलेलं नाही की तुम्ही करु नका म्हणून," असं उत्तर देताना दिसतात. त्यानंतर बराच वेळ हा वाद सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.

पोलिसांनी नोटीस

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सदर शेतकऱ्याच्या तक्रारीची दखल घेत पुणे पोलिसांनी मनोरमा यांना चौकशीसंदर्भात पूर्व तयारी केली होती. त्यांना अन्य एका प्रकरणात नोटीस देण्यात आल्यानंतर त्या पती दिलीप खेडकर यांच्याबरोबर पळून गेल्या.