पुणे : कोंढवा येथे संरक्षक भिंत कोसळून १५ जणांचा मृत्यू झाला. या घटनेतून बचावलेल्या एक मजुराने आपल्यावर ओढवलेल्या प्रसंगाचा अनुभव कथन केला. या अपघातातून विमल शर्मा हा मजूर वाचला. त्याने सांगितलेला अनुभव अंगावर काटा आणणारा आहे. आम्ही सगळे रात्री झोपेत होतो, तेव्हा एक मोठा आवाज झाला. मला वाटले की इमारतच कोसळली. संपलं आपले. मात्र थोड्याच वेळात लक्षात आले की येथील भिंत कोसळली.
विमल शर्मा सांगतो, मी इथे परवाच आलो. या दुर्घटनेत माझ्या सख्ख्या भावाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत १८ लोक भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास मोठा आवाज झाला. मला वाटले इमारतच कोसळली, की काय? लोक वाचवा वाचवा असे ओरडत होते. माझ्या गावातले काही लोक शेजारच्या झोपडीत रहात होते, त्यांनी मला भिंत कोसळल्याचे सांगितले.
आम्हाला येथे राहण्यासाठी पत्र्याची शेड उभारून देण्यात आली होती. त्याठिकाणी आम्ही राहत होतो. मी पुण्यात येऊन जाऊन मजुरीची कामे करतो. मात्र अशी घटना मी कधी पाहिली नव्हती. गावात शेतीच्या कामांसाठी मी गेलो होतो. पुण्यात परतलो आणि काल रात्री ही घटना घडली. या दुर्घटनेत माझा भाऊ गेला हे सांगताना त्याला अश्रू अनावर झाले होते.