Pune Lok Sabha Nivadnuk Nikal 2024 : पुण्यातील आश्चर्यकारक निकाल! मुरलीधर मोहोळ विजयी रवींद्र धंगेकर यांचा पराभव

पुण्यात आश्चर्यकारक निकाल पहायला मिळाला आहे. महायुतीचे मुरलीधर मोहोळ विजयी झाले आहेत. तर, रवींद्र धंगेकर यांचा पराभव झाला आहे.

वनिता कांबळे | Updated: Jun 4, 2024, 04:26 PM IST
Pune Lok Sabha Nivadnuk Nikal 2024 : पुण्यातील आश्चर्यकारक निकाल! मुरलीधर मोहोळ विजयी रवींद्र धंगेकर यांचा पराभव title=

Nagpur Lok Sabha Election Results 2024 Live : पुणे लोकसभा मतदार संघात मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) विजयी झाले आहेत... महाविकास आघाडीच्या रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि नुकतेच मनसेतून वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलेले वसंत मोरेंचा (vasant more) पराभव झाला आहे. विजयानंतर मुरलीधर मोहोळांनी कार्यकर्त्यांसोबत गुलाल उधळत जल्लोष साजरा केला.

पुण्याची जागा सर्वात लक्षवेधी ठरली होती. पुण्यात तिरंगी लढत झाली. पुण्याच्या जागेवरुन महायुती आणि महाविकासआघाडीमध्ये नाराजीनाट्य रंगले होते. भाजपमध्ये मुरलीधर मोहोळ यांच्या उमेदवारीमुळे जगदीश मुळीक नाराज झाले होते.  काँग्रेसने रवींद्र धंगेकरांच्या उमेदवारी दिल्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल नाराज झाले होते. तर, वसंत मोरे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले. मनसेची साथ सोडून वसंत मोरे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीमध्ये प्रवेश केला. वंचितच्या तिकीटावरच वसंत मोरे यांनी निवडणुक लढवलीमुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर की वसंत मोरे? पुण्यात कोण बाजी मारणार?  याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.

तीन उमेदवार रिंगणात होते तरी पुण्यातली लढाई ही भाजपच्या मुरलीधर मोहोळ आणि मविआच्या रवींद्र धंगेकरांमध्ये झाली. दोघेही पुणे महापालिकेत नगरसेवक होते. मुरलीधर मोहोळ नंतर महापौर झाले. तर रवींद्र धंगेकर गटनेते.. रवींद्र धंगेकरांनी नंतर कसबा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव करत आमदारकी पटकावली.

पुण्याचं राजकीय गणित

कधीकाळी काँग्रेसचं वर्चस्व असलेला पुणे मतदारसंघ आता भाजपचा बालेकिल्ला बनला आहे.  2004 आणि 2009 मध्ये काँग्रेसचे सुरेश कलमाडी खासदार म्हणून निवडून आले. त्यांनी भाजप उमेदवारांना पराभूत केलं. मात्र, 2014 मध्ये भाजपचे अनिल शिरोळे यांनी काँग्रेसच्या डॉ. विश्वजीत कदमांना तब्बल 3 लाखांच्या फरकानं धूळ चारली. 2019 मध्ये भाजपनं गिरीश बापटांना मैदानात उतरवलं आणि त्यांनीही काँग्रेसच्या मोहन जोशींचा सव्वा तीन लाखांच्या मताधिक्यानं पराभव केला. मार्च 2023 मध्ये गिरीश बापटांच्या निधनानंतर याठिकाणी पोटनिवडणूक झालीच नाही. पुण्यातील 6 पैकी शिवाजीगर, कोथरूड, पर्वती आणि पुणे कॅन्टोन्मेंट या 4 विधानसभा मतदारसंघात भाजपचेच आमदार आहेत. वडगाव शेरीतून राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे निवडून आलेत तर गेल्यावर्षी मुक्ता टिळकांच्या निधनांतर झालेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी आपल्या पॅटर्ननं विजयश्री खेचून आणली.