सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : देशाने स्वातंत्र्याची पंच्यात्तरी ओलांडली तरी जाती पातीमुळे होणारे अत्याचार 21 व्या शतकातही सुरु असल्याचे पाहायला मिळत आहेत. पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातही (Maharashtra News) हा प्रकार सर्रास सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. श्री गौड ब्राह्मण समाजाच्या (Sri Goud Brahmin Caste Panchayat) जातपंचायतीने सामाजिक बहिष्काराची भीती दाखवल्याने 400 मुलांची लग्नच होत नसल्याची (400 marriages stopped ) धक्कादायक बाब समोर आहे. जात पंचायतीच्या धाकामुळे तरुणांची लग्ने रखडल्याने त्यांच्या पालकांनी चिंता व्यक्त केली आहे. दुसरीकडे आता जातपंचायतीच्या या मनमानी कारभाराविरोधात पुण्याच्या (Pune News) बिबेवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांत तक्रार दाखल
आंतरजातीय विवाह, पुनर्विवाह यांना कायदेशीर मान्यता असताना देखील जात पंचायतीच्या मनमानीमुळे श्री गौड ब्राह्मण समाजातील तब्बल ४०० विवाह रखडले आहेत. समाजातून कुटुंबांना बहिष्कृत करणे, दंड ठोठावणे असे बेकायदेशीर प्रकार जात पंचायतीकडून सर्रास चालू असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आता थेट पोलिसांत धाव घेतली असून या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाळीत टाकल्यामुळे कुटुंबातील इतर मुलांची लग्न रखडली
श्री गौड ब्राम्हण समाजात मुलींचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने मुलांना लग्नासाठी मुलीचं मिळत नाहीत. त्यामुळे अनेक मुलांनी पोटजातीत किंवा आंतरजातीय लग्न करत आपला जोडीदार निवडला आहे. त्यानंतर या समाजाच्या जातपंचायतीने त्यांच्या पूर्ण कुटुंबालाच वाळीत टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. समाजातून वाळीत टाकल्यामुळे त्यांच्या कुटुंबातील इतर मुलांची लग्न होत नाहीयेत. तसंच कुठल्याही नातेवाईकांच्या मंगल कार्यात अथवा दुःखद प्रसंगी त्यांना सहभागी होऊ दिले जात नाही. त्यामुळे केवळ जात पंचायतीच्या मनमानी कारभारामुळे या कुटुंबांना हा त्रास सहन करावा लागत आहेत. यातून बाहेर पडता यावं यासाठी बहिष्कार टाकलेल्या कुटुंबांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे मदतीचा हात मागितला होता. यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पुणे पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जातीत पुन्हा घेण्यासाठी लाखोंचा दंड
दरम्यान, याप्रकरणी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने एक पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली होती. यावेळी बोलताना मुक्ता दाभोळकर यांनी याबाबत माहिती दिली होती. "महाराष्ट्रात काही हजार श्रीगौड ब्राह्मण कुटुंबे आहेत. त्यांपैकी विवाहासाठी इच्छुक असणाऱ्यांनी जातीबाहेर विवाह केले होते. त्यानंतर जातपंचायतीकडून त्यांच्यावर बहिष्कार टाकला गेला. त्यांना पुन्हा जातीत सामावून घेण्यासाठी लाखो रुपये दंड आकारला जातो. अशा अनेक तक्रारी महाराष्ट्र अंनिसकडे आल्या आहेत. या मनमानीमुळे अनेक कुटुंबांचे शोषण झाले आहे," असे मुक्ता दाभोळकर यांनी म्हटले होते.