प्रेयसीला भेटायला बुरखा घालून गेला पण लोकांना आला भलताच संशय, नागरिकांनी तरुणासोबत काय केलं वाचा

Pune News Today: प्रेयसीला भेटण्यासाठी तरुणाने लढवलेली शक्कल पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. काय घडलं नेमकं?

सागर आव्हाड | Updated: Nov 8, 2023, 01:44 PM IST
प्रेयसीला भेटायला बुरखा घालून गेला पण लोकांना आला भलताच संशय, नागरिकांनी तरुणासोबत काय केलं वाचा title=
pune news boyfriend wear burqa and went school to meet his gf

Pune News Today:  प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं असं नेहमी म्हणतात. प्रेमात असलेले प्रियकर आणि प्रेयसी कोणत्याही अडचणींचा सामना करण्यास तयार असतात. असाच एक प्रकार पुण्यात देखील घडला आहे. प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकराने लढवलेली शक्कल पाहून तुम्हीदेखील डोक्यावर हात माराल. 

प्रेमात पडलेले जोडपी एकमेकांना भेटण्यासाठी नवनवीन शक्कल लढवत असतात. कधी-कधी त्यांचा हा जुगाड चालून जातो, मात्र कुणी पकडल्यानंतर त्यांची तारांबळ होते. असाच काहीसा प्रकार पुणे शहरात घडला आहे. नेमकं काय घडलं पाहूयात. 

काय घडलं नेमकं?

अल्पवयीन प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकर चक्क तिच्या शाळेत बुरखा घालून गेला होता. परंतु त्याचा हा जुगाड काही कामी आला नाही. परिसरातील नागरिकांना त्याच्यावर संशय आला आणि त्याला पकडले. मुलाला पकडल्यानंतर मात्र वेगळीच अफवा सगळीकडे पसरली. बघता-बघता लहान मुले पळवणारी टोळी आली अशी अफवा परिसरात पसरली. याच अफवेतून काहींनी या तरुणावर हात साफ करुन घेतला. नंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. यामुळे तरुणाची मोठी फजिती झाली. पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात असलेल्या इंदिरानगरमध्ये हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी तरुणावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. विजय अमृत वाघारी असं अटक करण्यात आलेल्या प्रियकराचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विजयचे आदर्श इंदिरानगर परिसरातील शाळेमध्ये इयत्ता दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर प्रेम होते. दोघेही एकमेकांना भेटून फिरण्यासाठी बाहेर जात होते. काही दिवसांनी दोघांच्या प्रेमाची कुणकुण त्यांच्या कुटुंबियांना लागली होती. त्यानंतर कुटुंबियांनी दोघांनाही समज देऊन एकमेकांना भेटण्यासाठी मज्जाव केला. 

प्रेयसीला भेटता येत नसल्याने विजय अस्वस्थ झाला होता. त्याला काहीही करुन तिची भेट घ्यायची होती. मात्र कुटुंबीयांनी विरोध केल्यामुळं तो उघडपणे तिला भेटू शकत नव्हता. अखेर त्याने एक भलताच प्लान रचला. कोणाला ओळखू येऊ नये म्हणून तो चक्क बुरखा घालून तिच्या शाळेत जाण्याचा प्लान आखला. कोणाला संशय येऊ नये म्हणून त्याने पायात लेडिज चप्पलदेखील घातली होती. मात्र, त्याचा हा प्लान फसला. मुलं चोरणाऱ्या टोळीचा मेंबर समजून परिसरातील नागरिकांनी त्याला चोपून काढलं. तसेच पोलिसांच्या ताब्यात दिले.