रिकव्हरी एजंटकडून पोलीस कर्मचाऱ्यालाच घरात घुसून मारहाण

रिकव्हरी एजंटची पोलिसांवर हात उचलण्यापर्यंत मजल

Updated: Sep 7, 2022, 05:20 PM IST
रिकव्हरी एजंटकडून पोलीस कर्मचाऱ्यालाच घरात घुसून मारहाण title=

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे :  सहसा लोकांना जेव्हा अचानक पैशांची चणचण भासते तेव्हा ते कर्ज घेण्याचा पर्याय निवडतात. बरेचदा असे देखील होते की कर्जाचे काही हप्ते (EMI) भरल्यानंतर लोक अडचणीत येतात आणि हप्ते थकू लागतात. यानंतर बँकांचे कर्ज वसुली करणारे एजंट कर्जदाराला त्रास देऊ लागतात. कर्ज वसूल करण्यासाठी एजंट कधीही आणि कुठेही अपमानास्पद वागणूक करतात आणि कॉल करुन गैरवर्तन करतात. मात्र या सर्व कृती बेकायदेशीर आहेत, परंतु आजकाल ते अगदी सामान्य झाले आहे. 

असाच काहीसा प्रकार पुण्यात (Pune) समोर आला आहे. मात्र यावेळी चक्क पोलिसांवरच (Policeman) हात उचलण्यापर्यंत या रिकव्हरी एजंटची (recovery agent) मजल गेली आहे. क्रेडिट कार्डचे बिल (credit card bill) थकवल्याने पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आलीय. एका फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांची गुंडागर्दी सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

आरबीएल बँकेचे क्रेडिट कार्डचे बिल थकवल्यामुळे बिल वसुलीसाठी आलेल्या चार कर्मचाऱ्यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ससाने नगरमध्ये मंगळवारी सायंकाळच्या वेळी हा प्रकार घडला. तर या पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरातील एका महिलेसोबत धक्काबुक्की करत तिचा विनयभंग देखील करण्यात आला.

अर्जुन लक्ष्मण राऊत, निखिल ज्ञानेश्वर ताम्हाणे, परम नामदेव पाटील आणि ऋषिकेश हनुमंत पांदीवाले अशी आरोपींची नावे आहेत. हडपसर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी घुसून रिकव्हरी एजंट व त्याच्यासोबत आलेल्या कर्मचाऱ्यांनी मारहाण करत इमारतीमध्ये गोंधळ घातला. यानंतर याप्रकरणी पोलीस ठाण्यात घरात बेकायदा घुसून कुटुंबीयांना मारहाण केल्याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान, पोलीस कर्मचाऱ्यांवरच अशा प्रकारचे हल्ले होत असतील तर सर्वसामान्यांच्या बाबतीत काय होत असेल असेल तसेच रिकव्हरी एजंटच्या नावाखाली गुंडगिरी करणाऱ्यांना कायद्याचा धाक नाही का ? असे प्रश्न उपस्थित होत आहेत