Devendra Fadnavis on Rahul Gandhi over Pune Porsche Accident: पुण्यातील पोर्शे कार अपघाताला जबाबदार अल्पवयीन चालकाला जामीन देताना निबंध लिहिण्याची अट घातल्याने काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी नाराजी जाहीर केली आहे. "श्रीमंत आणि गरिबांसाठी न्याय हा समान हवा," अशी टीका त्यांनी केली आहे. यावरुन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांना सुनावलं आहे. अशा घटनेचं फक्त राजकारण करणं हे राहुल गांधींसारख्या व्यक्तीला शोभत नाही असं ते म्हणाले आहेत.
"पुण्यातील घटनेवर राहुल गांधी यांनी जे विधान केलं आहे, व्हिडीओ रिलीज केला आहे ते राजकारण करण्याचा फार वाईट प्रयत्न आहे. पुण्याच्या घटनेत पोलिसांनी योग्य कारवाई केली. ज्युवेनाईल जस्टिस बोर्डाने जो निर्णय घेतला त्यावर आम्हीही आश्चर्य व्यक्त केलं. पोलिसांना पुन्हा अपील दाखल केली आहे. अल्पवयीन मुलाला गाडी देणारा पिता, मद्य देणारे या सर्वांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे माझ्या मते पोलिसांनी सर्व कारवाया केल्या आहेत," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
"पण अशा घटनेचं फक्त राजकारण करणं हे राहुल गांधींसारख्या व्यक्तीला शोभत नाही. प्रत्येक गोष्टीला मतांच्या चष्म्यातून पाहणं आणि राजकारण करणं योग्य नाही. त्यांनी जर नीट माहिती घेतली असती तर असं विधान केलं नसतं," अशी टीकाही त्यांनी केली. तसंच अग्रवाल कुटुंबाच्या छोटा राजन कनेक्शनबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले, "जे काही कनेक्शन असतील त्यांची चौकशी होईल. त्यांच्या प्रत्येक गोष्टींवर कारवाई केली जाईल".
नरेंद्र मोदी दो हिंदुस्तान बना रहे हैं - जहां न्याय भी दौलत का मोहताज है। pic.twitter.com/uuJHvDdeRD
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 21, 2024
अनिल देशमुख यांनी राजीनाम्याची मागणी केल्याबद्दल विचारण्यात आलं असता फडणवीस म्हणाले की, "ज्यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचा आरोप आहे, ज्यांच्यावर कोर्टाने एफआयपर केला आहे त्यावर माझी प्रतिक्रिया कशाला मागता?".
"जर बस, ट्रक, ओला, उबर किंवा रिक्षा चालकाकडून झालेल्या अपघातात एखाद्याचा मृत्यू झाला तर त्यांना 10 वर्षांचा तुरुंगवास सुनावला जातो. मात्र 16 ते 17 वर्षांचा श्रीमंत कुटुंबातील मुलगा जेव्हा दोघांचे प्राण घेतो तेव्हा त्याला निबंध लिहायला सांगितलं जातं. ट्रक आणि ओला चालकांना का नाही अषी निबंध लिहिण्याची शिक्षा का दिली जात?" असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला आहे. "न्याय हा सर्वांसाठी समान हवा. यासाठीच आम्ही संघर्ष करतोय. आम्ही न्यायासाठी लाढत आहोत. श्रीमंत आणि गरीब या दोघांसाठीही समान न्याय हवा," असं राहुल गांधींनी व्हिडीओच्या शेवटी म्हटलं आहे.
कार अपघातातील मुलाचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांचे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनशी संबंध असल्याची माहिती उघड झाली आहे. सुरेंद्र कुमार अग्रवाल यांच्याविरोधात मुंबई सत्र न्यायालयात खटला सुरू आहे. संपत्तीच्या वादातून भावाविरुद्धच वाद सुरू आहे. यात सुरेंद्र कुमार अग्रवाल यांनी थेट छोटा राजनकडून मदत घेतल्याचा आरोप आहे. विशाल अग्रवाल यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.