Pune Porsche Accident: पुणे पोर्शे (Porsche) कार अपघात प्रकरणावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संताप व्यक्त केला आहे. पोलीस आयुक्त (Police Commisisoner) कोणाला मदत करत आहेत? अशी विचारणा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. तसंच पुण्याच्या पोलीस आयुक्तांना ताबडतोब बडतर्फ केलं पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे. पोलीस आय़ुक्त आणि कोर्टांने काय 'दो आँखे बारा हात' सिनेमा सुरु केला आहे का? अशी विचारणाही संजय राऊतांनी केली आहे.
पुण्यातील कल्याणीनगर परिसरात भरधाव वेगात असणाऱ्या पोर्शे कारने दिलेल्या धडकेत अनिस आणि त्याची अश्विनी कोष्टा यांचा मृत्यू झाला. आरोपी 17 वर्षीय अल्पवयीन तरुण असून, पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर नंतर त्याला जामीन मंजूर झाला. फक्त 15 तासात तरुणाला जामीन मंजूर झाल्याने तसंच कोर्टाने ठेवललेल्या अटी यावर आश्चर्य व्यक्त होत असताना संजय राऊत यांनीही संताप व्यक्त केला आहे.
"पुण्याच्या पोलीस आयुक्तांना ताबडतोब बडतर्फ केलं पाहिजे. पोलीस आयुक्तांनी कोणाला मदत केली? दोन निष्पाप जीवांचे बळी गेले. एक माजोरडा, दारुडा असा तरुण मुलगा जो बिल्डरचा मुलगा आहे तो दारु पित असल्याचा व्हिडीओही समोर आला आहे. तुम्ही काय रिपोर्ट दिला आहे. भ्रष्ट पोलीस आयुक्त, पोलीस यंत्रणा आणि तितकाच भ्रष्ट एक आमदार," अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.
पुण्यातील जनतेने पोलीस आयुक्तांसमोर जाऊन आंदोलन केलं पाहिजे. हे सगळं काय चालू आहे? असा प्रश्न संजय राऊतांनी केला आहे. आमदार रवींद्र धंगेकर याविरोधात आंदोलन करत आहेत. शिवसेनाही त्यात सहभागी होईल अशी माहिती संजय राऊतांनी दिली आहे.
"2 तरुण एका मस्तवाल मुलाच्या निष्काळजीपणामुळे, श्रीमंतीच्या माजोरड्यापणामुळे रस्त्यावर तडफडून मरण पावली असताना पोलीस आय़ुक्त कोणाला वाचवत आहेत? अजित पवार गटाचे आमदार तशेच वागणार, हे माणुसकीशून्य लोक आहेत. बाजूला दोन मुडदे पडले असताना तुम्ही त्याला पोलीस ठाण्यात पिझ्झा, बर्गर खायला घालत आहात. खोटा मेडिकल रिपोर्ट देत आहात.अशा लोकांवर पुणेकरांनी सामाजिक बहिष्कार टाकला पाहिजे. असे पोलीस आयुक्त पुण्याला लाभले हा कलंक आहे," अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. पोलीस आय़ुक्त आणि कोर्टांने काय 'दो आँखे बारा हात' सिनेमा सुरु केला आहे का? हा सगळा पैशाचा खेळ आहे असंही संजय राऊत म्हणाले आहेत.