पुण्यातील हिट अँड रन प्रकरणी दोन डॉक्टरांना अटक; ब्लड रिपोर्टची अदलाबदल करणं भोवलं

Pune Porsche Accident: कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा ब्लड रिपोर्ट बदलल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. 

नम्रता पाटील | Updated: May 27, 2024, 09:58 AM IST
पुण्यातील हिट अँड रन प्रकरणी दोन डॉक्टरांना अटक; ब्लड रिपोर्टची अदलाबदल करणं भोवलं title=

Pune Porsche Accident Case : पुण्याच्या कल्याणनगर परिसरात झालेल्या हिट अँड रन प्रकरण हे चांगलेच चर्चेत आहे. मद्यधुंद अवस्थेतील एका अल्पवयीन आरोपीनं पोर्शे कारने दोघांना चिरडल्याने तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणात बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या मुलाला वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले. आता याप्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा ब्लड रिपोर्ट बदलल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. 

कल्याणीनगर अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीने मद्यप्राशन केले होते की नाही, हे तपासण्यासाठी तब्बल 9 तासांनी पोलिसांनी ब्लड टेस्ट केली होती. ससून रुग्णालयात ही ब्लड टेस्ट करण्यात आली होती. या चाचणीत मुलगा दोषी आढळू नये, यासाठी ससून रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनीच त्याच्या रक्ताच्या नमुन्याची अदलाबदल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ अजय तावरे आणि डॉ श्रीहरी हर्सूल या दोघांना रविवारी (26 मे) अटक करण्यात आली. पुण्यातील गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

कसून चौकशी सुरु

सध्या पुणे पोलीस आयुक्तालयात डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर यांची कसून चौकशी सुरु आहे. या दोघांना दुपारी शिवाजीनगर न्यायालयात हजर केले जाणार आहे. मात्र, या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. तसेच ड्रग तस्कर ललित पाटील प्रकरणात देखील ससून रुणालयातील डॉक्टरांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता दोन डॉक्टरांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यामुळे ससून रुग्णालयाच्या भ्रष्टाचाराने बरबटलेल्या प्रशासनावर अनेक सवाल उपस्थित होऊ लागले आहेत . 

गेल्या काही दिवसांपासून कल्याणीनगर परिसरात पोर्शे कारने दोघांना चिरडणाऱ्या बिल्डरच्या मुलाला वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आल्याचे समोर येत होते. याप्रकरणी येरवाडा पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांनी मदत केल्याचा आरोप झाला होता. तसेच यात ड्रायव्हरलाही कबुली जबाब बदलण्यासाठी धमकवण्यात आल्याची तसेच त्याला डांबून ठेवल्याची माहिती समोर आली होती.

नेमकं प्रकरणं काय?

पुण्याच्या कल्याणीनगरमधील अपघातानं सपूर्ण राज्य हादरलं आहे. मद्यपान करून बेदरकारपणे आलिशान पोर्शे कार चालवणाऱ्या अल्पवयीन तरुणानं बाईकला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की अश्विनी कोष्टा आणि अनिस अहुदिया या दोघांचा जागीच मृत्यू झाला.  पुणे हिट अँड रन प्रकरणी अग्रवाल बाप लेकांपाठोपाठ आता आजोबालाही जेलमध्ये डांबण्यात आलं आहे. ड्रायव्हरला डांबून ठेवून त्याला धमकावल्याप्रकरणी आजोबा सुरेंद्र अग्रवालला पुणे पोलिसांनी अटक केली. त्याला 28 मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दारुच्या नशेत गाडी चालवून दोघांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन आरोपाली सध्या बाल सुधारगृहात ठेवण्यात आलंय. त्याचे वडील विशाल अग्रवाल सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. तर आजोबा सुरेंद्रला आज पोलीस कोठडीत डांबण्यात आलं. त्यामुळे अग्रवाल कुटुंबियांच्या तीन पिढ्या आता जेलमध्ये आहेत.