Vidhan Parishad Election: मनसेनं भाजपाविरुद्ध दिला उमेदवार! पक्षाने जाहीर केलं उमेदवाराचं नाव

Vidhan Parishad Election 2024: देशात लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचा प्रचार सुरु आहे. या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी झाल्यानंतर 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. असं असतानाच महाराष्ट्र पुढील निवडणुकीसाठी सज्ज झाला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 27, 2024, 08:58 AM IST
Vidhan Parishad Election: मनसेनं भाजपाविरुद्ध दिला उमेदवार! पक्षाने जाहीर केलं उमेदवाराचं नाव  title=
भाजपा विरुद्ध मनसे असा संघर्ष पाहायला मिळणार

Vidhan Parishad Election 2024: लोकसभा निवडणुकीतील शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी पार पडणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर राज्यामध्ये विधान परिषदेची निवडणूक पार पडणार आहे. महाराष्ट्रातील राजकीय पक्ष आता या आगामी निवडणुकीच्या तयारीला लागले असून ठाकरे गटाने काही दिवसांपूर्वी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. असं असतानाच आता महाराष्ट्र नव निर्माण सेनेनंही या निवडणुकीसाठी आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. राज ठाकरेंच्या नेतृत्वाखालील मनसेनेच यासंदर्भातील घोषणा केली आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीसाठी प्रचार सभा घेणाऱ्या राज ठाकरेंचा उमेदवार आता भाजपाविरुद्धच उभा असेल.

मनसेनं कोणाला दिली उमेदवारी?

देशात लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचा प्रचार सुरु आहे. या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी झाल्यानंतर 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या निवडणुकीनंतर राज्यात लगेच शिक्षक मतदार संघ आणि विधान परिषदेच्या जागेसाठी निवडणूक होणार आहे. यासाठी मनसेनं आपला पहिला उमेदवार जाहीर केला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेचे नेते आणि प्रसिद्ध दिग्दर्शक अभिजीत पानसेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ही निवडणूक 26 जून रोजी होणार आहे. 

भाजपा विरुद्ध मनसे लढत

दुसरीकडे भाजपाने या मतदारसंघातून निरंजन डावखरेंना मैदानात उतरवलं असल्याने इथं मनसे विरुद्ध भाजपा अशी थेट लढत होणार आहे. अभिजित पानसे हे या मतदारसंघात ओळखीचा चेहरा असल्याने पक्षाला याचा फायदा होईल असं सांगितचलं जात आहे. दुसरीकडे कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरे दोनदा निवडून आले आहेत. मनसे पदवीधर निवडणुकीच्या माध्यमातून बऱ्याच काळानंतर निवडणुकीच्या मैदानात दिसणार आहे. दुसरीकडे निरंजन डावखरे यांना भाजपाचाच पारंपारिक मतदारसंघ मिळाला असल्याने त्यांनाही विजयाची खात्री वाटत आहे. लवकरच या निवडणुकीचा प्रचार सुरु होणार असून आता लोकसभेच्या माध्यमातून मित्रपक्ष झालेले हे दोन्ही पक्ष या निवडणुकीत एकमेकांशी कसे लढतात हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

उद्धव ठाकरे गटानेही जाहीर केले 2 उमेदवार

मुंबई पदवीधर मतदारसंघातून ठाकरे गटाने काही दिवसांपूर्वीच अनिल परब तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून ज. मो. अभ्यंकर यांना उमेदवारी यापूर्वीच जाहीर झाली आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाने पत्रक काढून या नावांची घोषणा केली. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर ठाकरेंची साथ न सोडणाऱ्या नेत्यांमध्ये अनिल परब यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. ते उद्धव ठाकरे यांचे विश्वासू नेते आहेत. सध्या परब हे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे विधानपरिषदेमध्ये प्रतिनिधित्व करतात. महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये परब यांनी परिवहन मंत्री म्हणून काम पाहिले आहे. तसेच ते रत्नागिरी जिह्याचे पालकमंत्रीही होते. परब यांना 2012 ते 2018 या कार्यकाळासाठी विधानपरिषदेवर संधी देण्यात आलेली. आता पुन्हा पदवीधरच्या माध्यमातून परबांवर ठाकरेंनी विश्वास टाकला आहे.