'या' कारणामुळे झाला रानगव्याचा मृत्यू, वनअधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

 नागरिकांनी गर्दी केली, त्यांनी सहकार्य करायला हवं होतं अशी चिंता पाटील यांनी व्यक्त केली. 

Updated: Dec 9, 2020, 06:36 PM IST
'या' कारणामुळे झाला रानगव्याचा मृत्यू, वनअधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण title=

पुणे : पुण्यात आज पकडलेल्या रानगव्याचा दुर्देवी मृत्यू झाला. यानंतर प्राणी प्रेमी संघटनांनी रोष व्यक्त केलाय. जर हे रेस्क्यू ऑपरेशन होते तर मग रानगव्याचा मृत्यू कसा होऊ शकतो ? असा प्रश्न प्राणी संघटना विचारतायत.  रानगव्याला बेशुद्ध करण्यासाठी तीन वेळा इंजेक्शन देण्यात आले होते. रानगव्याच्या तोंडाला आणि पायाला लागलं होतं. या कारणांमुळे मृत्यू झाल्याचे म्हटले जात होते. आता वनविभागातर्फे यासंदर्भात अधिकृत माहिती देण्यात आलीय.

आपण त्याच्या जंगलात अतिक्रमण केलंय. मानवी वस्तीत तो येणं स्वाभाविक आहे असं पुण्यातील उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी म्हटलंय. रेस्क्यू झाल्यानंतर गव्याच्या शरीरातील उष्णता कमी वाढली. सलग खूप काही पळाल्यामुळे तो थकला होता असे ते म्हणाले. भुलीच्या इंजेक्शनचा गव्याला ओव्हरडोस झाल्याचा आरोप करण्यात येत होता. यावरही पाटील यांनी स्पष्टीकरण दिलंय. घटनास्थळी प्राण्यांचे डॉक्टरही होते. दोनदा भूल देण्याचा प्रयत्न केला. भुलीच्या इंजेक्शनचा ओव्हर डोस वैगरे काही झालं नसल्याचे ते म्हणाले. नागरिकांनी गर्दी केली, त्यांनी सहकार्य करायला हवं होतं अशी चिंता पाटील यांनी व्यक्त केली. 

रानगवा (Wild Animal Gava) महात्मा सोसायटीच्या भरवस्तीत घुसल्याने (Wild Animal Gava Entered In Pune) अनेकांची पळापळ झालेली कोथरुड परिरात पाहायला मिळाली. त्याला बघण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी केली होती. वाट चुकलेला रानगवा (Gava) महात्मा सोसायटीच्या परिसरात सुरुवातीला दिसला. दरम्यान, कुत्र्यांच्या हल्ल्यात हा रानगवा जखमी झाला आहे. तर त्याला पकडण्यासाठी वनविभाग आणि महापालिकेचे पथकाने रेस्क्यू ऑपरेशन हाती घेतले होते. अखेर सहा तासांच्या नाट्यानंतर या रानगव्याला जेरबंद करण्यात यश आले होते.

पुण्याच्या कोथरुड भागात आढळलेला रानगवा शहराच्या दिशेने पळाला. वनविभागाला चकवा देत रानगवा पळालाय. ५० ते ६० जण गव्याला पकडण्यासाठी प्रयत्न करत होते. दाट लोकवस्तीच्या कोथरुड डेपो परिसरात रानगवा आढळून आला आहे. तो बिथरला असून पळतांना त्याच्या तोंडाला जखम झाली आहे. दरम्यानस तो २० ते ३० मिनिटे सातत्याने पळत होता. त्यामुळे तो थकलेला दिसत होता. 

पुण्याच्या कोथरुड भागातल्या महात्मा सोसायटीत रानगवा दिसून आला. अत्यंत दाट लोकवस्तीत रानगवा आढळल्याने परिसरात खळबळ उडाली होती. गवा सोसायटी परिसरात आल्याने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. पहाटे फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना रानगवा दिसल्यानंतर एकच धांदल उडाली. पहाटे साडेपाचच्या सुमारास हा प्रकार आढळून आला. रानगवा पाहण्यासाठी सध्या बघ्यांची गर्दी झाली होती. रेस्क्यूसाठी वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्याला पकडण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली होती. ही मोहीम दुपारी १२.१५ वाजता यशस्वी झाली.