जादूटोण्याच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार

जादूटोण्याच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार केल्याची घटना 

Updated: Feb 7, 2020, 12:21 PM IST
जादूटोण्याच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार  title=

हेमंत चापुडे, झी मिडीया, पुणे : जादूटोण्याच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार केल्याची घटना पुण्यात समोर आली होती. या आरोपीला पोलीसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंर अटक पुर्व जामिनावर त्याला सोडण्यात आले होते. दरम्यान मोकाट फिरणाऱ्या आरोपीकडून पीडित महिलेवरती पुन्हा एकदा बलात्काराचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये पीडित महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. 

पीडित महिला ही बाहेरील गावची रहिवासी असून पोटाची खळगी भरण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून पेरणे येथे वास्तव्य करत आहे. महिलेच्या पतीने काही दिवसापूर्वी राहूल वाळके या आरोपी कडून उसने पैसे घेतले होते आणि याचाच फायदा घेत आरोपीने पिडित महिलेशी मैत्री करत पीडित महिलेवर पेरणे फाटा परिसरात जादुटोण्याचा वापर करत वारंवार बलात्कार केला.

यानंतर पिडीत महिलेने याप्रकरणी लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून आरोपी राहूल वाळके वर बलात्कार आणि जादूटोण्यासारखे गंभीर गुन्हे दाखल असून आरोपी अटक पूर्व जामीनावर मोकाट फिरत आहे.  

यानंतर पीडित महिलेने आरोपीपासून होणाऱ्या धमक्या पासून सुटका करण्यासाठी महिलेने आपले घर बदलत महिला वास्तव्यासाठी कोरेगाव भीमा येथे आली परंतु आरोपीने येथेही महिलेला त्रास देण्याचा प्रयत्न करत बुधवारी रात्री आरोपीने पीडित महिलेच्या घरी जाऊन महिलेवर पुन्हा एकदा बलात्कार करण्याचा प्रयत्न करत महिलेला जीवे मारण्याचाही प्रयत्न केला.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या प्रकरणावर प्रचंड नाराजी व्यक्त केली. बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात आरोपीला अटक पूर्व जामीन मिळतोच कसा ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. यावर नाराजी व्यक्त करत आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

याप्रकरणी आता शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये पीडित महिलेच्या तक्रारीवरून रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला असून आरोपीला तातडीने अटक करून कडक कारवाई करू असे शिक्रापूर पोलिसांनी सांगितले आहे.

राज्यात सध्या महिला असुरक्षित असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत असतानाच बलात्कारासारख्या संवेदनशील विषयात मोकाट फिरणाऱ्या आरोपीकडून पीडित महिलेशी पुन्हा एकदा दुष्कृत्य करत जिवे मारण्याचा प्रयत्न करणे ही धक्कादायक बाब असून पोलिसांनी अशा आरोपींवर कडक कारवाई करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.