Rahul Gandhi on Ayodhya Ram Temple: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आदिवासी असल्याने राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला त्यांना प्रवेश दिला नाही असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. तुमच्यासाठी येथे जागा नाही असं भाजपाने त्यांना सांगितलं होतं असा खळबळजनक आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. या कार्यक्रमात फक्त अरबपती, नरेंद्र मोदी, मोहन भागवत आणि निवडलेल्या 1 टक्के लोकांनाच प्रवेश देण्यात आला असंही त्यांचं म्हणणं आहे. ते ठाण्यात बोलत होते.
"राम मंदिराच्या कार्यक्रमात तुम्हाला गरीब, मजूर, शेतकरी दिसला का? पण उद्योगपती, बॉलिवूड सेलिब्रिटी सगळे दिसले. देशाच्या राष्ट्रपती आदिवासी आहेत. त्यांनाही प्रवेश दिला नाही. तुम्ही राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला येऊ शकत नाही. तुमच्यासाठी येथे जागा नाही असं त्यांना सांगण्यात आलं. झारखंडचे मुख्यमंत्री आदिवासी असल्याने त्यांनाही येऊ दिलं नाही. या कार्यक्रमात फक्त अरबपती, नरेंद्र मोदी, मोहन भागवत आणि निवडलेले 1 टक्के लोक जाऊ शकतात असं सांगण्यात आलं," असा दावा राहुल गांधींनी केला आहे.
"करोनात किमान 50 लाख लोकांचा मृत्यू झाला. करोनामध्ये भारतात मृतदेहांचे खच पडत असताना लस बनवणारी कंपनी नरेंद्र मोदींना पैसे देत होती. एकीकडे मृतदेह आणि दुसरीकडे लस बनवणारी कंपनी सिरम इन्सिट्यूट थेट नरेंद्र मोदींच्या पक्षाला करोडो रुपये देत होती. नरेंद्र मोदी तुम्हाला थाळी वाजवा, फोनची फ्लॅशलाइट लावा सांगत होते. तुम्ही थाळी वाजवत असताना पूनावाला तुमच्या खिशातून पैसे काढत भाजपाला देत होते. करोनात तुमचे पैसे चोरले," असा आरोप राहुल गांधींनी केला आहे.
पुढे ते म्हणाले की, "कंपन्यांच्या याद्या बाहेर आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरचा हफ्ता सुरु आहे. जो आवाज उठवतो त्यांना अमित शाह धमकावत जेलमध्ये टाकून देतात. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादीमध्ये फूट कशी पाडली? आमदार जे पळाले आहेत ते फुकटात पळाले असं वाटतं का? या सर्वांना नरेंद्र मोदींच्या सरकारने फीट केलं आहे. इलेक्टोरल बाँडमधून हफ्ता घेतात आणि महाराष्ट्र. गोवा, मणिपूर, अरुणाचल प्रदेश येथील सरकार पाडतात. अमित शाह, मोदी आणि अदानी सरकार पाडण्यासाठी उभे राहतात".