ठाणे : दलित युथ पॅंथरच्या कार्यकर्त्यांनी ठाणे रेल्वे स्टेशनवर पुन्हा रेल रोको आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात घेतले आहेत.
काल महाराष्ट्र बंद दरम्यान मुंबईत ठिकठिकाणी रेल रोको आणि रास्ता रोको करण्यात आलं. त्यानंतर आज सकाळपासून दैनंदिन व्यवहार, वाहतूक सुरळीत आहे. मात्र दुपारी १२ वाजताच्या सुमारास दलित युथ पँथरच्या कार्यकर्त्यांनी ठाणे स्टेशनच्या फलाट क्रमांका चारवर रेल रोको केला. भिडे, एकबोटे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी या कार्यकर्त्यांनी केली. त्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी रेल्वे काही वेळासाठी विस्कळीत झाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यावर रेल्वे सेवा सुरळीत आहे.
भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराचा निषेध म्हणून महाराष्ट्र बंद काल यशस्वीरित्या पाळला गेला. काही ठिकाणी तोडफोड करण्यात आली. रेल रोकोमुळे मुंबईची लाईफलाईन लोकल सेवा विस्कळीत झाली होती.