कोकणसह राज्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस

 राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावलीय. कोकणसह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला. 

Updated: Nov 20, 2018, 06:36 PM IST
कोकणसह राज्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस title=
संग्रहित छाया

मुंबई : राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावलीय. कोकणसह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला. अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे पाऊस कोसळतोय. हा पाऊस शेतकऱ्यांसाठी थोडं हसू, थोडं आसू अशाप्रकारचा आहे असं म्हणावं लागेल. शेतकऱ्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या द्राक्षबागा, डाळींब, कांदा, टोमॅटो आदी पिकांना या अवकाळी पावसामुळे फटका बसलाय. तर काही ठिकाणी झालेला पाऊस रब्बीच्या पिकासाठी फायदेशीर असणार आहे. प्रामुख्याने गहू आणि लाल कांदा या पिकासाठी अवकाळी जीवनदान ठरणार आहे.

काल दुपारी कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात देवरुख, लांजा, संगमेश्वर, रत्नागिरीत पाऊस पडला. त्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली. तर सिंधुदुर्गातही चांगला पाऊस झाला. यावेळी वादळाचा जोरदार तडाखा बसला. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. या पावसाचा फटका महावितरणला बसला त्यामुळे अनेक ठिकाणी विजेचा लंपडाव होता. तर रत्नागिरीत काल दिवसभर वीजपुरवठा खंडीत होता.

 दुष्काळी लातूर जिल्ह्यात पाऊस

दुष्काळाने होरपळत असलेल्या लातूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस बरसत आहे. काल मध्यरात्रीनंतर लातूर शहरात ही जोरदार पाऊस झाला. जवळपास ४० ते ४५ मिनिटे हा पाऊस बरसत होता. गेल्या दोन दिवसांपासून औसा, निलंगा तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक भागात हा अवकाळी पाऊस बरसला आहे. एकीकडे ऐन उन्हाळ्यात गरमीमुळे हैराण असलेल्या नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला आहे. 

ज्या बहुतांश शेतकऱ्यांनी जमिनीत ओलच नसल्यामुळे अद्याप रब्बीच्या पेरण्याच केलेल्या नाहीत. अशा शेतकऱ्यांच्या पेरणीच्या आशा या पावसामुळे पल्लवीत झाल्या आहेत. जर आणखी असाच अवकाळी पाऊस बरसला तर अनेक शेतकरी हे पेरणी करू शकतात. त्यामुळे हा अवकाळी पाऊस दुष्काळी लातूर जिल्ह्यात वरदान ठरावा अशी आशा शेतकरी राजा बाळगून आहे. दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून बरसत असलेल्या या पावसामुळे मध्यरात्रीच्या सुमारास विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे महावितरणने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिक करीत आहेत.