मुंबई : Rain in Maharashtra : राज्याला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. आता पुढील 48 तास महत्त्वाचे आहेत. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात (Konkan) अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, पावसाचा मराठवाड्याला ( Marathwada) जबरदस्त तडाखा बसला आहे. 10 जणांचा मृत्यू झाला असून 200 जनावरं दगावली आहेत. बीडमध्ये अनेक गावांचा संपर्क तुटला तर उस्मानाबादमध्ये पुरात अडकलेल्यांची हेलिकॉप्टरच्या मदतीने सुटका करण्यात आली आहे.
मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील पूरस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला आहे. त्यांनी प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला काही सूचना केल्या आहेत.
अरबी समुद्रात नवं वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळेपुढील 48 तास राज्यासाठी महत्त्वाचे आहेत. गुलाब चक्रीवादळाचं तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘गुलाब’ चक्रीवादळ निवळले असून त्याचं रुपांतर अती तीव्र अशा कमी दाबाच्या पट्ट्यात झाले आहे.
त्यामुळे येत्या 24 तासात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. उद्या हे कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्रात प्रवेश करणार आहे.. अरबी समुद्रात त्याची तीव्रता पुन्हा वाढून नवे चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज आहे. अरबी समुद्रात नवे चक्रीवादळ तयार झाल्यास त्याचे नाव ‘शाहीन’ असणार आहे. या वादळामुळे राज्यातील अनेक भागात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.