रायगडचे जनजीवन विस्कळीत, बाजारपेठेत पुराचे पाणी घुसले

रायगड जिल्‍हयात सर्वत्र पावसाची संततधार सुरुच आहे. त्‍यामुळे जिल्‍हयातील जनजीवन विस्‍कळीत झाले आहे. महाडमध्‍ये पूरस्थिती निर्माण.

Updated: Jul 7, 2018, 06:46 PM IST
रायगडचे जनजीवन विस्कळीत, बाजारपेठेत पुराचे पाणी घुसले  title=

अलिबाग : रायगड जिल्‍हयात सर्वत्र पावसाची संततधार सुरुच आहे. त्‍यामुळे जिल्‍हयातील जनजीवन विस्‍कळीत झाले आहे. महाडमध्‍ये पूरस्थिती निर्माण झाली असून बाजारपेठेतील अनेक भागांमध्‍ये पाणी घुसलं आहे . पाऊस थांबत नसल्‍याने सावित्री नदीची पाणी पातळी आता ८ मीटरच्‍या वर पोहोचली आहे . त्‍यामुळे संपूर्ण परीसर जलमय झाला आहे . महाड शहरात येणारे दोन्‍ही मार्ग बंद आहेत.  नागरीकांना सतर्कतेचे आदेश देण्‍यात आले आहेत. नगरपालिका तसेच महसूल प्रशासनाची यंत्रणा कार्यरत झाली आहे. 

मार्गावरील वाहतूक बंद

अनेक ठिकाणी शाळांना सूटी देण्‍यात आली आहे .  इकडे सुधागड तालुक्‍यात सुरू असलेल्‍या मुसळधार पावसामुळे पाली खोपोली मार्गावरील आंबा व जांभुळपाडा नदीला पूर आला असून दोन्‍ही ठिकाणच्‍या पूलांवरून पाणी वाहू लागले आहे . त्‍यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्‍यात आले आला आहे.  जुन्‍या मुंबई - पुणे महामार्गावर कलोते येथे रस्‍त्‍यावर पाणी आल्‍याने वाहतूक काही ठिकाणी वळवण्‍यात आली आहे. रेल्‍वे रूळांवर पाणी आल्‍याने कर्जत पनवेल व कर्जत - मुंबई वाहतुकीवर परीणाम झाला आहे.

नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली

 रायगड जिल्‍हयाच्‍या बहुतांश भागात पाऊस सुरू असून दक्षिण रायगड मधील महाड आणि पोलादपूर तालुक्‍यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्‍यामुळे महाड शहराच्‍या दोन्‍ही बाजूंनी वाहणाऱ्या गांधारी आणि सावित्री या दोन्‍ही नद्यांनी  धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीची धोकापातळी ६.५० मीटर असून पावसामुळे पाण्‍याची पातळी ६.६० मीटरवर पोहोचली आहे. शहरातील दस्‍तुरी नाक्‍यावर पाणी आलं असून महड ते रायगड रस्‍ता पाण्‍याखाली गेला आहे. नाते रस्‍ताही पाण्‍याखाली गेला आहे. त्‍यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्‍यात आली आहे.

 महड आणि परिसरात रात्रीपासून पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर असाच राहिला तर महड शहराला पुराचा धोका संभवतो आहे. महाड नगरपालिकेनं शहरातील नागरिकांना धोक्‍याचा इशारा दिला आहे. तसंच सर्व संबंधित यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.