पंचगंगेची धोका पातळीकडे वाटचाल, जांभळीतील संपर्क तुटला

जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असून पंचगंगा नदीची राजाराम बंधारा पातळी ४१ फूट २ इंच इतकी झालीय.

Updated: Jul 22, 2017, 09:04 AM IST
पंचगंगेची धोका पातळीकडे वाटचाल, जांभळीतील संपर्क तुटला  title=

कोल्हापूर : जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असून पंचगंगा नदीची राजाराम बंधारा पातळी ४१ फूट २ इंच इतकी झालीय.

पंचगंगा नदीची धोक्याच्या पातळीजवळ वाटचाल सुरू झालीय. पंचगंगा नदीची धोका पातळी ४३ फूट इतकी आहे... तर जांभळी आणि कासारी नदीलादेखील पूर आलाय.

इतकंच नव्हे तर या पुराचं पाणी बाजारभोगाव इथल्या बाजारपेठेत शिरलंय. बाजारभोगाव ते पोहाळे तर्फ बोरगाव दरम्यान असणाऱ्या मोडक्या वडाजवळील मोरीवर पाणी बुधवारी रात्री आल्यानं कोल्हापूर - बाजारभोगाव अणुस्करा - राजापूर या १९३ राज्यमार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

परिसरातील जांभळी खोऱ्याला जोडणाऱ्या काऊरवाडी इथल्या भिवराज मंदिराशेजारी असणाऱ्या एकमेव मार्गावर कासारी नदीच्या पुराचे पाणी आल्यानं जांभळी खोऱ्यातील लोकांचा संपर्क तुटला आहे. 

तसंच या परिसरातील दूरध्वनी आणि मोबाईल सेवाही बंद आहे. यामुळे या परिसरातील दूध संकलन बंद आहे तसंच पुरामुळे  शाळाही बंद ठेवण्यात आल्यात.