पुणे : ‘डीएसके चिटर नाहीत, ते अडकले आहेत. त्यांना या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मराठी माणसांनी पुढे यावं असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलय. डीएसके कुणाचे पैसे बुडवणार नाहीत, ठेवीदारांनी त्यांना सहकार्य करावं.
ते म्हणाले की, ‘आज काही राजकीय पुढाऱ्यांशी संबंधित अमराठी लोक त्यांना उध्वस्त करु पहात आहेत. तसे होऊ नये याची खबरदारी आपण घ्यायला पाहीजे’ असंही राज म्हणाले. अडचणीत असलेल्या डीएसकेंच्या पाठी उभं राहण्यासाठी काही ठेवीदार एकवटले आहेत. राज ठाकरे यांनी आज त्यांची पुण्यात बैठक घेतली.
राज ठाकरेंनी एकप्रकारे डीएसकेंची बाजू घेतली आहे. राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे डीएसकेंना मोठा दिलासाही मिळण्याची शक्यता आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज त्या ठेवीदारांच्या भेटीसाठी आले आहेत. बीएमसीसी रस्त्यावरील दरोडे सभागृहात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. इथे राज ठाकरे काय भूमिका मांडतात याबद्दल उत्सुकता होती.
कारण डीएसकेंनी केलेल्या फसवणूकीचं प्रकरण आधीच न्यायालयात गेलंय. जवळ जवळ १ हजार ठेवीदारांनी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार दाखल झालेल्या गुन्हामध्ये डीएसके सध्या अटकपूर्व जामिनासाठी लढताहेत. पुणे सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामिन आधीच फेटाळलाय. दरम्यान आज राज ठाकरेंसोबत झालेल्या बैठकीत सुमारे दीडशे ठेवीदार उपस्थित होते. बंद हॉलमध्ये ही बैठक पार पडली. माध्यम प्रतिनिधींनाही बैठकीतून बाहेर ठेवण्यात आलय.