रत्नागिरी : आशिया खंडातील सर्वात मोठा ग्रीन रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यातल्या नाणार परिसरात प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया शासनाकडून सुरू झाली असताना या प्रकल्पाचा विरोध आता तीव्र होत आहे. त्यातच आता या प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी आज तालुका बंदची हाक देण्यात आलीय.
प्रकल्पविरोधी शेतकरी, मच्छिमार यांच्यावतीने या तालुका बंदची हाक देण्यात आलीय. तालुक्यातील विविध संघटनांनी या बंदला पाठिंबा दर्शविलाय. दरम्यान या बंदमध्ये राजापूर तालुक्यातील सर्व बाजारपेठा या गुरूवारी बंद राहणार आहेत. त्यामुळे आता विविध आंदोलन आणि त्यानंतर बंदची हाक देवून आता पुन्हा एकदा प्रकल्पाविरोधातले वातावरण तापू लागलंय.
काल मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रकल्पग्रस्तांची भेट घेऊन त्यांची गाऱ्हांनी ऐकली. त्यानंतर ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अहवाल सादर करणार आहेत. या अहवालानंतर राज ठाकरे काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, या प्रकल्पाला शिवसेनेने विरोध केलाय. मात्र, ग्रामस्थांचा शिवसेनेवर विश्वास नसल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पग्रस्तांना शांत करण्याचा चेंडू शिवसेनेच्या कोर्टात टाकलाय. त्यामुळे या प्रकल्पाबाबत काय निर्णय होणार, याकडे लक्ष लागलेय.