सोलापूर : साखर कारखान्यामध्ये साखर शिल्लक राहिल्यामुळे त्याच्यावर जे कर्ज काढले जाते त्याच्या व्याजाचा बोजा कारखान्यावर पडतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी तुकड्या तुकड्याने पैसे घ्यावे असे शरद पवार साळसूदपणे सांगतात. पण, याच शरद पवारांनी कृषीमंत्री असताना नाबार्डकडून कर्ज दिले नाही. कारण त्यांना जिल्हा बॅंक आणि राज्य बॅंकातील बगल बच्चे यांना पोसायचे होते, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला.
एका खासगी कार्यक्रमानिमित्त राजू शेट्टी सोलापुरात आले होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधला. अठरा वीस महिने शेतकऱ्यांचा ऊस शेतात उभा असतो. एवढे महिने शेतकऱ्यांचे पैसे त्यात गुंतलेले असतात. त्याचे व्याज त्यावर चालू असते. याचा विचार पवारांनी केला नाही?
साखरेच्या व्याजावरचा मुद्दा पवार साहेबांना भेडसावत असेल तर दहा वर्ष ते कृषीमंत्री होते. १० वर्षे नाबार्ड त्यांच्या हाताखाली होती. त्यांच्या इशाऱ्यावर ती काम करत होती. नाबार्डकडे निधीची कमतरता नाही.
नाबार्डने डेअरी उद्योगाला देतात तसे साखर उद्योगाला उचल किंवा कर्ज दिले असते तर साखर उद्योगाला जिल्हा बॅंक किंवा राज्य सहकारी बॅंकेकडून 13 टक्क्याने कर्ज घ्यावे लागले नसते. कर्ज अवघ्या 2 टक्क्याने मिळाले असते तर साखर कारखाने अडचणीत सापडले नसते, असे ते म्हणाले.
शरद पवारांनी शेतकऱ्यांचे हित न पाहता बांडगुळांना पोसण्याचे काम केले, अशी टीका शेट्टी यांनी केली. नितीन गडकरी यांच्या धोरणामुळे साखरेचे उत्पादन 22 टक्के कमी होऊन इथेनॉलचे उत्पादन वाढले मात्र हेच धोरण दहा वर्षे कृषीमंत्री असताना शरद पवारांना का राबवता आले नाही, असा सवालही त्यांनी केला.
आज सकाळी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय साखर परिषदेचे उदघाट्न केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री यांनी केलेल्या विधानाची राजू शेट्टी यांनी खिल्ली उडविली.
तुम्ही मुख्यमंत्री होऊन अडीच वर्षे झाले तरी अजूनही तुम्ही बाळासाहेब थोरात आणि अजित पवार यांच्याकडेच बघता. ते दोघे कारखानदार आहेत. त्यांना पाहिजे तसे ते धोरण राबवणार. पण, महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून निवडून दिले आहे. अजित पवार आणि थोरांत यांना नाही याची जाणीव मुख्यमंत्र्यांनी ठेवावी, असा टोला त्यांनी लगावला.
विधान परिषदेबाबत मला कोणतीही ऑफर आलेली नाही आणि माझी इच्छादेखील नाही. लोकांना मी आमदार व्हावे असे वाटत असेल तर लोकांनीच मला लोक वर्गणी काढून मला निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.