पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज पुण्यात साखर आयुक्तांची भेट घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या. राज्यातील सर्व साखर कारखान्यांनी एक रक्कमी एफआरपी द्यावी, डिसेंबर मध्ये तीन हजार तीनशे आणि राहिलेली रक्कम जानेवारी पर्यंत द्यावी. ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची प्रमुख मागणी आहे, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.
मी महाविकास आघाडीवर नाराज आणि भाजप सरकारवर खुश असं काही नसून, माझी वाटचाल अशीच असणार आहे, जो आडवा येईल त्याला तुडवायचं हे धोरण कायम असणार असल्याचं राजू शेट्टी यावेळी म्हणाले.
जरंडेश्वर सोबतच राज्यातील एकूण 43 कारखान्यात घोळ आहे. मग फक्त जरंडेश्वरच लक्ष्य का? असा प्रश्न राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे. गैरसोयीच्या माणसाचा घोटाळा बाहेर काढायचा अन सोयीच्या माणसाचा झाकून ठेवायचा, अशी टीका राजू शेट्टी यांनी आरोप करणाऱ्या किरीट सोमय्यांवर केली आहे. मी सहा वर्षांपूर्वी हेच सांगत होतो. लिस्ट फार मोठी आहे, सगळे चोर आहेत, चोरांना सरकार पाठीशी घालत आहेत, असा आरोपही शेट्टी यांनी केला आहे.
राज्यातील साखर कारखाने हे राजकारणाचे अड्डे बनले आहेत. जे कारखाने एक रक्कमी एफआरपी देणार नाहीत ते कारखाने चालू देणार नाही. असा इशारा देखील त्यांनी सरकारला दिला आहे.
हर्बल तंबाखू पिकवण्यास परवानगी द्यावी असे पत्र भाजपचे आमदार तसेच माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांना पाठवले होते. त्यावर हर्बल तंबाखूचा पहिला प्रयोग सदाभाऊ खोत यांनी आपल्या शेतात करावा असा टोला शेट्टी यांनी लगावला.