कर्जत : शरद पवारांच्या तालमीत घडलेल्या रोहित पवारांनी एक वेगळंपण दाखवून दिलं. कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार रोहित पवार यांनी भाजपचे पराभूत उमेदवार राम शिंदे यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. रोहित पवारांनी यावेळी राम शिंदे यांच्या आईचे आशीर्वाद घेतले. तर राम शिंदे यांनीही रोहित पवारांना विजयी फेटा बांधून शुभेच्छा दिल्या. निवडणूक म्हटलं की, हारजीत आली. काँटे की टक्कर आली. पण एकदा निकाल लागला की, वैर कसं विसरायचं आणि प्रतिस्पर्ध्याला कसं जिंकायचं, याचा आगळं उदाहरणच रोहित पवार आणि राम शिंदेंनी दाखवून दिलं.
संपूर्ण राज्याचे लक्ष कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाकडे लागलं होतं. कारण रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यात ही थेट लढत होती. एकीकडे पवारांचे नातू तर दुसरीकडे भाजप सरकारमधील मोठे नेते एकमेकांसमोर होते. या लढतीत रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा 42 हजार मतांनी पराभव केला.
याला म्हणतात आदर्श राजकारण pic.twitter.com/3MVClx8lYb
— shailesh Musale (@shailesh_musale) October 24, 2019
रोहित पवार हे थेट राम शिंदे यांच्या घरी पोहोचल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. तर राम शिंदे यांनी देखील विजयाचा फेटा बांधून रोहित पवार यांचा यावेळी सत्कार केला.