मुंबई : कोरोना व्हायरसने सध्या जगभरात थैमान घातले आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचे आतापर्यंत १७ रुग्ण आढळले आहेत. यासाठी सरकारतर्फे निर्देश जारी करण्यात आले आहेत. दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची एक क्लीप सोशल मीडियात व्हायरल होतेय. त्यात ते गो कोरोना, कोरोना गो असे म्हणत आहेत.
कोरोनाचा आवर घालण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात असताना आठवलेंची ही क्लीप हास्याचा विषय ठरत आहे. असं गो कोरोना म्हणून कोरोना जात नसतो अशी प्रतिक्रिया सोशल मीडियातून येत आहे. यावर आठवलेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. गो कोरोना म्हणण्याचा माझा उद्देश वेगळा होता असे त्यांनी स्पष्ट केले. कोरोना देशातून नष्ट व्हावा हाच उद्देश होता. करोनाचे बारा वाजवण्यास आम्ही समर्थ आहोत असेही ते म्हणाले.
केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा विदेशी नागरिकासोबतचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत चायना-इंडिया साँग असं म्हणत रामदास आठवलेंनी एक प्रार्थना केली आहे. 'कोरोना गो.... गो कोरोना गो....'असे या गाण्याचे बोलत आहेत.रामदास आठवलेंसोबत विदेशी नागरिक देखील ही प्रार्थना करत आहे.
या व्हिडिओत भारतीय ध्वजाचं चिन्ह असलेला एक पोस्टर देखील दिसत आहे. एवढंच नव्हे तर या व्हिडिओ असलेल्या नागरिकांनी हातात मेणबत्या पेटवल्या आहेत. रामदास आठवलेंच्या या व्हिडिओवरून अनेकांनी त्यांना ट्रोल केलं आहे.
पुण्यात आज एक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १० वर गेली असून राज्यात कोरोना बाधितांची संख्या आता १७ वर गेली आहे. आज नागपुरात २ आणि पुण्यात १ कोरोना रुग्ण आढळला. राज्यात आज कोरोनाचे ३ रुग्ण आढळले आहेत. सर्व रुग्णांची योग्य ती काळजी घेतली जात असल्याची माहिती पुण्यातील आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. काही रुग्ण परस्पर माध्यमांशी संपर्क करत आहेत. माध्यमांनी देखील अफवांना बळी पडू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.