दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : विधानपरिषद निवडणुकीत उमेदवार जाहीर झाल्यानंतर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीचा सुर होता. ही नाराजी काही प्रमाणात दूर करण्यासाठी भाजपने मागील आठवड्यात अर्ज दाखल केलेले डॉ. अजित गोपछडे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेऊन काल अर्ज दाखल केलेल्या रमेश कराड यांचा अर्ज कायम ठेवला आहे.
मागील आठवड्यामध्ये भाजपकडून रंजीतसिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडाळकर, प्रविण दटके आणि डॉ. अजित गोपछडे या चार उमेदवारांची विधानपरिषद निवडणुकीसाठी नावे जाहीर केली होती. त्यामुळे निवडणुकीत भाजपचे हे चार अधिकृत उमेदवार असतील हे स्पष्ट झाले होते.
मात्र काल अचानक भाजपकडून रमेश कराड आणि संदीप लेले यांचे अर्ज दाखल करण्यात आले. याआधी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या चार उमेदवारांपैकी एखादा अर्ज बाद झाला तर अडचण नको त्यामुळे म्हणून खबरदारी म्हणून काल दोन अर्ज भरण्यात आले होते. लेले आणि कराड यांचे अर्ज डमी असतील, आणि या दोघांचे अर्ज मागे घेतले जातील अशी काल चर्चा होती.
मात्र आज अर्ज छाननीनंतर भाजपने रमेश कराड यांच्याऐवजी दोन अर्ज डमी असत डॉ. अजित गोपछडे आणि संदीप लेले यांचा अर्ज मागे घेऊन धक्कातंत्राचा अवलंब केला. या धक्कातंत्रामागेही काही कारणं दडलेली आहेत.
एकतर नुकतेच पक्षात आलेले रणजितसिंह मोहिते पाटील आणि लोकसभा निवडणुकीत भाजविरोधात भुमिका घेणारे गोपीचंद पडाळकर यांना उमेदवारी देताना पक्षातील इच्छुक असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, पंकजा मुंडे यांना डावललं होतं.
पंकजा मुंडे यांना डावलल्याने त्या स्वत: नाराज होत्याच. मात्र वंजारी समाजही भाजपवर प्रचंड नाराज होता. वंजारी समाजाची नाराजी दूर करण्यासाठी पक्षाने वंजारी समाजाचे रमेश कराडे यांना उमेदवारी दिल्याची चर्चा आहे.
विधानसभा निवडणुकीत लातूर ग्रामीण मतदार संघातून निवडणुक लढवण्याची जोरदार तयारी रमेश कराडे यांनी केली होती. मात्र भाजपने हा मतदारसंघ शिवसेनेला सोडला होता. शिवसेनेची तिथे जराही ताकद नसताना, रमेश कराड यांचा मतदारसंघात चांगला जनसंपर्क असताना भाजपने ही जागा सोडल्याने रमेश कराडही तेव्हा नाराज झाले होते.
विशेष म्हणजे रेणापूर हा पुर्वीचा गोपीनाथ मुंडे यांच्या मतदारसंघातील बराचसा भाग मतदारसंघ पुनररचनेत लातूर ग्रामीण या मतदार संघात जोडला गेला. त्यामुळे गोपीनाथ मुंडेंचाच मतदार संघ भाजपने शिवसेनेला सोडला अशी नाराजीची भावना वंजारी समाजात होती.
त्यामुळे भाजपने रमेश कराड यांना विधानपरिषदेची उमेदवारी देऊन स्वत: रमेश कराड यांची, पंकजा मुंडे यांची आणि वंजारी समाजाची नाराजी काही प्रमाणत दूर करण्याचा प्रयत्न केलाय.
विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत नऊच अर्ज आता शिल्लक राहील्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. आणि रमेश कराड
हे आमदार झाल्यात जमा आहेत.