राष्ट्रवादी सोडताना राणा जगजितसिंह पाटील यांना अश्रू अनावर

जिल्ह्याच्या विकासासाठी आपण हे परिवर्तन करतोय. 

Updated: Sep 1, 2019, 08:44 AM IST
राष्ट्रवादी सोडताना राणा जगजितसिंह पाटील यांना अश्रू अनावर title=

मुस्तान मिर्झा, झी मीडिया, उस्मानाबाद: राष्ट्रवादी काँग्रेसचे उस्मानाबाद जिल्ह्याचे नेते आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा निर्णय जाहीर केला. आपण काळजावर दगड ठेवून हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी म्हटले. यावेळी कार्यकर्त्यांसमोर राणा जगजितसिंह पाटील अश्रू अनावर झाले. 

राणा पाटील यांचे वडील माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांनी त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्तेसुद्धा आपल्या नेत्याला पाहून भावुक झाले.

गेल्या अनेक दिवसांपासून राणा जगजितसिंह पाटील हे भाजपात जाणार असल्याची चर्चा होती. राणा जगजितसिंह पाटील यांनी सुरुवातीला याविषयी भाष्य करण्यास नकार दिला. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेला गैरहजेरी लावून त्यांनी भाजपात जाणार असल्याचे संकेत दिले होते.

यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचे जाहीर केले. अपेक्षेप्रमाणे त्यांनी कालच्या परिवार संवाद कार्यक्रमात भाजपमध्ये जाणार असल्याचा निर्णय जाहीर केला. 

जिल्ह्याच्या विकासासाठी आपण हे परिवर्तन करतोय. शरद पवार हे दैवत होते, आहे आणि राहतील. अतिशय जड अंत:करणाने आपण हा निर्णय घेतल्याचे राणा पाटील म्हणाले. त्यानंतर राणा पाटील हे भावुक झाले.

पद्मसिंह पाटील गेल्या ४५ वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे अत्यंत जवळचे सहकारी आणि विश्वासू मानले जात होते. मात्र त्यांनीही आज इतरांप्रमाणे भाजपाची वाट धरली आहे. 

सेनेचा आक्षेप, दिली गाढवाची उपमा
उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजितसिंह यांच्या भाजपा प्रवेशावर शिवसेना नेते आणि जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांनी आक्षेप घेतला आहे. गाढवाने जरी वाघाचं घोंगडं घालून वाघाच्या कळपात शिरण्याचा प्रयत्न केला तरी ही जनता तुमच्यावर गाढव असल्याचं शिक्कामोर्तब विधानसभा निवडणुकीत केल्याशिवाय राहणार नाही, असा टोला सावंत यांनी लगावला आहे.