कुळ, अपुरं, खोडशी... ठाण्यात भरलंय रानभाज्यांचं फेस्टिव्हल

पावसाळा सुरू झाला की रानभाज्या उगवायला लागतात... शहरात तर या भाज्या मिळणं तसं कठिणच असतं... शहरात राहणाऱ्या लोकांना या वेगवेगळ्या भाज्यांची माहिती व्हावी, यासाठी ठाण्यात रानभाज्यांच्या फेस्टिवलचं आयोजन केलं होतं. 

Updated: Jun 22, 2017, 06:03 PM IST
कुळ, अपुरं, खोडशी... ठाण्यात भरलंय रानभाज्यांचं फेस्टिव्हल  title=

कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे : पावसाळा सुरू झाला की रानभाज्या उगवायला लागतात... शहरात तर या भाज्या मिळणं तसं कठिणच असतं... शहरात राहणाऱ्या लोकांना या वेगवेगळ्या भाज्यांची माहिती व्हावी, यासाठी ठाण्यात रानभाज्यांच्या फेस्टिवलचं आयोजन केलं होतं. 

पावसाळा सुरू झाला की शेतातून रानभाज्या डोकावू लागतात... या भाज्यांचा मौसम फक्त दोन महिन्यांचा... या भाज्या शहरी भागांत मिळणं तसं दुर्मीळच.... या भाज्यांची ओळख व्हावी आणि या भाज्या खायला मिळाव्यात, यासाठी ठाण्यात सीकेपी हॉलमध्ये फूड फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये कुळ,खुड्याची भाजी, शेवाळ, कर्णाची भाजी, कोरळ, अपुरं, कुडाच्या शेंगा, आलेपार्क, डाळीचा भरडा, खोडशी अशा विविध भाज्यांचा समावेश होता. यातल्या बहेतेक भाज्या औषधी आहेत. या भाज्यांचं महत्त्व कळावं, आणि नवी चवही चाखता यावी, यासाठी या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. 

या भाज्यांबरोबर मांसाहाराचंही उत्तम कॉम्बिनेशन करता येतं. शेवाळ ही खाजवणारी भाजी असते... त्यावर चांगली प्रक्रिया करून या भाजीत सोडे, खिमा असे मांसाहारी पदार्थ तयार करता येतात... तर अपुरं भिंत भाजीत जवळा घातला तर वेगळी भाजी तयार होते.  बहुतांश रानभाज्या या विविवध रोगांवर उपयोगी आहेत. अपुरं, कुडाच्या शेंगा आणि कोरल या मधुमेहावर गुणकारी आहेत. कुळीची भाजी, आलेपार्क या भाज्या म्हणजे पोटदुखीवरचं औषध आहे. ठाण्यातल्या या फूड फेस्टिवलमध्ये अनेक महिलांनी घरुन भाज्या तयार करुन आणल्या होत्या. या फूड फेस्टिवलला ठाणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला.