दोन दिवसातल्या पावसामुळं राज्याला अल्पसा दिलासा

शुक्रवारपासून राज्याच्या विविध भागात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. 

Updated: Jun 26, 2017, 09:49 AM IST
दोन दिवसातल्या पावसामुळं राज्याला अल्पसा दिलासा title=

मुंबई : शुक्रवारपासून राज्याच्या विविध भागात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. केरळात 48 तास लवकर आलेल्या मान्सूननं महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी सर्वांना वाट बघायला लावली. त्यानंतर कोकण आणि मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पावसानं सुरुवात केल्यावर लगेचच ब्रेक घेतला. पण गेल्या 48 तासात त्यानं जवळपास पंधरा दिवसांची कसर भरुन काढलीय असं म्हणायला हरकत नाही.

राज्याच्या सर्वचं भागात आता पेरण्यांनी जोर धरलाय खरा. कोकणात कालपासून पावसाने हजेरी लावली आहे तळ कोकणासह रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाचा हजेरी आहे. अजूनही काही भागात मुसळधार पाऊस पडतोय. बाकी ठिकाणी पावसाची संतत धार मात्र रात्रीपासून सुरु राहिली आहे. राजापूर लांजा रत्नागिरी संगमेश्वर चिपळूण या सगळ्याच परिसरात रात्री पासून पावसाचा सरी सुरु आहेत. सिंधुदुर्गाच्या ही काही भागात या पावसाने हजेरी लावली आहे. सावंतवाडी, बांदा या भागात पावसाने हजेरी लावली आहे. या पावसाने कोकणातील शेतीच्या रखडलेल्या कामाला वेग येणार आहे. पण विदर्भ मात्र अद्यापही कोरडाच आहे.

नागपूर, अमरावती, चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये अद्याप पावसानं जोर धरलेला नाही. पावसाने दडी मारल्याने नागपूरसह विदर्भातील शेतकरी चिंतेत आहेत. ७ जूनला येणाऱ्या मान्सूनचे आगमन तर झाले पण तरीही पाऊस आला नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाने अधिक उशीर केला तर दुबार पेरणीच्या संकटाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागेल अशी शंका आहे.