विशाल वैद्य, झी मीडिया, ठाणे : ठाण्यातील ठाणा कॉलेज परिसरातील खारटन रोड शितला माता मंदिर चौकातील रस्ता खचला आहे. या रस्त्यालर तब्बल 15 ते 16 फूट मोठा खड्डा निर्माण झाला आहे. या ठिकाणी ड्रेनेजचे काम सुरू होते. त्यावेळी अचानक रस्ता खचला गेला आणि भलामोठा खड्डा पडला.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण रस्ताच आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. याच ठिकाणाहून सिडको बस स्टॉप वरून नवी मुंबईच्या दिशेने बसेस सुटतात. तर, रेल्वे अंडरपास वरून चेंदणी कोळीवाडा, कोपरी या पूर्वेतील भागांतील वाहतूक सुरू असते. मात्र, सध्या ही पूर्ण वाहतूक बंद करण्यात आली असून महापालिकेचे आणि आपत्ती व्यवस्थापन चे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. याठिकाणी तातडीने रोड दुरुस्तीचे काम सुरु आहे.
मुंबई अहमदाबाद जोडणारा वसई खाडीवरील महत्वाचा नवीन वर्सोवा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई हून गुजरात दिशेने जुन्या पुलावरून होणाऱ्या वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे. 918 मिटर लांब आणि चार पदरी असा हा आधुनिक पद्धतीचा पूल असून नागरिकांच्या सोयीसाठी हा पूल हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतःच्या ट्विटर अकाउंट द्वारे दिली आहे. या पूलाचे रंग काम बाकी असून लवकरात लवकर तेही पूर्ण करण्यात येणार आहे.
धुळे शहरातील पांझरा नदीवर बनवण्यात येणाऱ्या ब्रिज कम बंधाऱ्यांचे काम केले दोन वर्षांपासून रखडले आहे. शहरातील पांजरा नदी वर कृषी उत्पन्न बाजार समिती ते पॉलिटेक्निक कॉलेजला जोडणाऱ्या रस्त्याच काम प्रस्तावित आहे. या रस्त्यांना जोडणारा पूल हा गेल्या दोन वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहे. पुलाच्या अर्धवट काम झालेले आहे मात्र हा पूल वापरता येईल यासाठी जे उतरण तयार केली पाहिजे ती तयार नाही. पुलाचं काम अर्धवट सोडून देण्यात आल्याने धुळेकरांना गैरसोईचा सामना करावा लागत आहे. ब्रिज कम बंधाऱ्यामुळे पांझरा नदीमध्ये पाणी साचणार असून, या पुलामुळे शहरातील दोन महत्त्वपूर्ण भाग एकमेकांशी जोडल्या जाणार आहे. येजा कारण्यासाठीचे अंतर ही कमी होणार आहे. मात्र, शासनाच्या उदासीनतेमुळे हे काम रखडले आहे.