'आपले काही नेते रात्रीच्या अंधारात सत्ताधाऱ्यांना..', रोहित पवारांना वेगळीच शंका; म्हणाले, 'विश्वासघात..'

Rohit Pawar Post About Leaders: रोहित पवार यांनी लोकसभेचा निकाल लागल्याच्या दुसऱ्याच दिवशी केलेल्या या पोस्टचा नेमका अर्थ काय? त्यांचा इशारा कोणाच्या दिशेने आहे यासंदर्भात राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 6, 2024, 12:33 PM IST
'आपले काही नेते रात्रीच्या अंधारात सत्ताधाऱ्यांना..', रोहित पवारांना वेगळीच शंका; म्हणाले, 'विश्वासघात..' title=
रोहित पवारांनी सोशल मीडियावरुन व्यक्त केल्या भावना (फाइल फोटो)

Rohit Pawar Post About Leaders: लोकसभा निवडणुकीमध्ये लढवलेल्या 10 जागांपैकी 8 जागा जिंकणाऱ्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी महाविकास आघाडीमधील काही नेत्यांसंदर्भात भलतीच शंका व्यक्त केली आहे. रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही शंका उपस्थित केली असून विधानसभा निवडणुकीमध्ये विश्वासघात होण्याची शक्यताही व्यक्त केली आहे.

आधी म्हणाले आमदार संपर्कात अन् नंतर...

रोहित पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्याच दिवशी अजित पवार गटामधील 18 ते 19 आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला. "अजित पवारांचे 19 आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर त्यांच्या गटातील 12 आमदार हे भाजपच्या संपर्कात असल्याचे बोललं जात आहे. ते काय करतील हे पुढच्या काही दिवसात आपल्याला समजेल. पण या 19 आमदारांपैकी कोणाला आमच्या पक्षात घ्यायचं आणि कोणाला घ्यायचं नाही हा निर्णय आमचे पक्षप्रमुख घेतील," असं विधान रोहित पवारांनी केलं. मात्र त्याच दिवशी रात्री रोहित पवारांनी आपल्या सोशल मीडियाव अकाऊंटवरुन भलतीच शंका उपस्थित केली.

नक्की काय म्हणाले रोहित पवार?

"राज्यात मविआला मिळालेला विराट विजय हा पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी न डगमगता उघडपणे केलेल्या संघर्षाचा, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचा आणि स्वाभिमानी जनतेचा आहे," असं रोहित पवारांनी आपल्या पोस्टच्या सुरुवातीला म्हटलं आहे. "धाडस दाखवून प्रामाणिकपणे केलेल्या कष्टाला सत्याची जोड असेल तर यशाला कुणीही रोखू शकत नाही. पण अशा परिस्थितीत आपल्या बाजूचे काही नेते रात्रीच्या अंधारात सत्ताधाऱ्यांना भेटून काही सेटिंग तर करत नव्हते ना? याचाही शोध घेण्याची गरज आहे. अन्यथा ऐन विधानसभा निवडणुकीत विश्वासघात होऊ नये, म्हणजे झालं," असं रोहित पवारांनी म्हटलं आहे. 

फडणवीसांना उपहासात्मक शुभेच्छा

"भाजपसह फोडलेल्या दोन्ही मित्रपक्षांची संख्या एक आकडी करून दाखवल्याबद्दल देवेंद्र फडणवीस साहेब आपलं त्रिवार अभिनंदन! हाच पराक्रम आता विधानसभेलाही करून दाखवा, त्यासाठी आपणास आगाऊ शुभेच्छा," असा टोला 4 जून रोजीच्या एका पोस्टमध्ये रोहित पवार यांनी लगावला आहे.

रोहित पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्याच दिवशी व्यक्त केलेल्या शंकेमध्ये त्यांचा निशाणा नेमका कोणावर आहे हे स्पष्ट झालेलं नाही.