CM Eknath Shinde Connection In Amol Kirtikar Loss: उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघामधील निकालावरुन राजकारण सुरु असतानाच आता ठाकरे गटाचे प्रवक्ते तसेच राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. अमोल किर्तीकरांच्या पराभवामागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हात असल्याचं सूचक विधान राऊत यांनी जाहीर पत्रकार परिषदेत केलं आहे. उत्तर पश्चिम मुंबईमधून शिंदे गटाचे रवींद्र वायकर आणि ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर यांच्यामध्ये थेट लढत होती. अमोल किर्तीकर हे अखेरच्या निकालात आघाडीवर असतानाच फेर मतमोजणी घेण्यात आल्यानंतर निकाल बदलला. या मतदारसंघात कीर्तिकरांचा अवघ्या 48 मतांनी पराभव झाला. यावरुनच आता राऊतांनी गंभीर आरोप केले आहेत.
अमोल किर्तीकरांच्या पराभवामागील मुख्यमंत्री शिंदेंच्या कनेक्शनचा आरोप राऊत यांनी केला आहे. पत्रकार परिषदेमध्ये राऊत यांना मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीला राज्यात लोकसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या यशावरुन विचारलेल्या प्रश्नाला दिलेल्या उत्तराचा संदर्भ देण्यात आला. ज्या महाविकास आघाडीच्या जागा वाढलेल्या आहेत त्यात संविधान बदलण्यासंदर्भात जो खोटा प्रचार कामी आला. विशिष्ट समाजाला धमकावलं गेल्याने असा निकाल लागला, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाल्याचा संदर्भ देत पत्रकारांनी राऊतांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
पत्रकारांनी शिंदेंचा उल्लेख करत विचारलेल्या या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत यांनी, "अमोल किर्तीकरांच्या प्रकरणामध्ये शिंदेंनी कोणाला धमकावलं? कोणत्या अधिकाऱ्यांना धमकावलं हे त्यांनी सांगावं नाहीतर मी सांगतो. अमोल किर्तीकरांच्या निकालामध्ये शेवटच्या क्षणी एकनाथ शिंदे यांनी कोणाला धमक्या दिल्या. कोणाकडून निकाल बदलून घेतला हे त्यांनी सांगावं, मग मी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देतो," असं म्हटलं.
नक्की वाचा >> मोदी-शाहांपेक्षा महाराष्ट्राचा फडणवीसांवर अधिक राग, त्यांचं नाव काळ्या अक्षरात लिहिलं जाईल, कारण...; राऊतांचा हल्लाबोल
लोकसभा निकालाच्या दुसऱ्या दिवशीही प्रसारमाध्यमांशी बोलातना राऊतांना किर्तीकरांचा पराभव हा शिंदे गटाने पाकिटमारी करुन मिळवलेला विजय असल्याची टीका राऊतांनी केली होती. 'अमोल किर्तीकर यांचा विजय झाला. मात्र त्यांचा विजय चोरला. वायकरांना ज्या पद्धतीने जिंकवलं त्याला मी चोरीचपाटी, पाकिटमारी बोलतो. तुमच्या हातात सत्ता आहे. पैसा आहे तर तुम्ही शिवसेनेची एक जागा पाकिटमारी करुन घेतली. ज्याला विजयी घोषित केलं. फेरमतमोजणीमध्ये विजयी घोषित केलं. त्यानंतर नाकारलेल्या मतांच्या आधारावर रायकरांना विजयी घोषित केलं. हा दरोडा आहे. त्याविरोधात आम्ही लढतोय,' असं संजय राऊत म्हणाले. 'ज्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सर्व प्रकार घडला, त्यांना सोडणार नाही,' असं म्हणत राऊतांनी एनडीच्या देशभरातील 25 टक्के जागा चोरलेल्या असून, रिटेनिंग ऑफिसरला त्याबाबतच जाब विचारला जाईल असा इशाराही दिला.