ठाकरे-फडणवीस वादात रामदास आठवले मुख्यमंत्री होणार?

Ramdas Athavale on Chief Minister Post: राज्यात सध्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यातील वादाची चर्चा रंगली आहे. यादरम्यान रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले (RPI Leader Ramdas Athavale) यांनी मोठं विधान केलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Aug 1, 2024, 01:04 PM IST
ठाकरे-फडणवीस वादात रामदास आठवले मुख्यमंत्री होणार?  title=

Ramdas Athavale on Chief Minister Post: राज्यात सध्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यातील वादाची चर्चा रंगली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असताना दोन्ही नेते एकमेकांवर कुरघोडी करताना दिसत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना ठोकून काढा असा संदेश दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी हात उगारला तर हात ठेवायचा नाही असं सांगितलं आहे. यादरम्यान रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले (RPI Leader Ramdas Athavale) यांनी मात्र या वादात उडी घेत हा वाद सुटला नाही तर आपणच मुख्यमंत्री होऊ असं विधान केलं आहे. 

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे  यांच्या जयंतीनिमित्त रामदास आठवले पुण्यात अभिवादन करण्यासाठी आले होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना  यावेळी पुढचा मुख्यमंत्री कोण असा प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामधील वाद मिटला नाही तर पुढचा मुख्यमंत्री मीच असेन असं म्हटलं. यानंतर एकच हास्यकल्लोळ झाला. दरम्यान यावेळी त्यांनी दोन्ही नेत्यांनी मनातून चीड काढून टाकावी. दोघांचे चांगले संबंध होते, पुन्हा त्यांची मैत्री व्हावी असं मला वाटत आहे असं आवाहनही केलं. 

एक तर तू राहशील किंवा मी राहीन - उद्धव ठाकरे 

मुंबईतील शाखा प्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, "अनिल देशमुखांनी सांगितले की मला व आदित्य ठाकरेंना आत टाकायचे डाव फडणवीस यांचे होते. सगळं सहन करुन मी हिंमतीने उभा राहिलो आहे. एक तर तू राहशील किंवा मी राहीन. आज माझ्याकडे चिन्ह, पैसा काहीच नाही. पण तुमच्या हिंमतीवर आव्हान देत आहे," असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. 

"लढाईला तोंड फुटत आहे. हर हर महादेव ही महत्वाची घोषणा आहे. लोकसभेत आणखी विजयाची अपेक्षा होती. अमोलही जिंकलाच आहे. अखिलेश, ममता बॅनर्जी यांची भेट झाली. अनेकजण बोलले की तुम्ही देशाला दिशा दाखवली. आम्ही असेच आहोत. वाकडे गेलात की तोडू. भाजपा म्हणजे चोर माणसं, राजकारणातील षंढ माणसं आहे. असा नडलो की मोदींना घाम फोडला. नरेंद्र मोदींचे भाषण बघताना आता किव येते. 10 वर्षं काय अंडी उबवली," अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. 

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

काही दिवसांपूर्वी झालेल्या भाजपाच्या कार्यकर्ता मेळव्यात देवेंद्र फडणवीस यांनी 'ज्याला बॅटिंग करायची आहे,  त्याने करा, मैदानात उतरा ठोकून काढा, पण अट एकच आहे, हीट विकेट होऊ नका, तुम्ही सगळे मैदानात उतरले पाहिजेत, असा आदेश देवेंद्र फडणवीसांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले. याला उद्धव ठाकरे यांनी जशास तसं उत्तर दिलं आहे, कोणी हात उगारला तर हात जागेवर ठेवायचा नाही, बिनधास्त अंगावर जा, आदेश  पाहिजे तर आदेश देतो, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.