पुणे : आरटीआय कार्यकर्ता विनायक शिरसाट यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी दोन जणांना अटक केलीय. मुक्तार अली आणि फारुख खान अशी या दोन आरोपींची नावं आहेत. विनायक शिरसाट यांचं अपहरण आणि हत्या अशा गुन्ह्याखाली या दोघांना अटक करण्यात आलीय. मात्र, हत्येचं कारण अद्यापही अस्पष्टच आहे. गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या विनायक शिरसाठ यांचा मृतदेह ताम्हिणी घाटात पोलिसांना आढळला. आज सकाळी शिरसाठ यांच्या भावाला - किशोर शिरसाठ यांना कपडे आणि फोनवरून मृतदेहाची ओळख पटली होती.
मात्र, यानंतर आरोपींना अटक होत नाही तोवर मृतदेह ताब्यात घेण्यास शिरसाट कुटुंबीयांनी नकार दिला होता. ससून रुग्णालयात मृतदेहाचं पोस्ट मॉर्टेम पार पडलं. यावेळी ससून रुग्णालयात नातेवाईक आणि आरपीआय कार्यकर्ते मोठ्या संख्येनं जमले होते. शिरसाट यांच्या मागे वडील सुधाकर शिरसाट, आई आशाबाई, पत्नी उर्मिला, भाऊ किशोर आणि वहिनी मनिषा असा परिवार आहे.
अधिक वाचा :- ताम्हिणी घाटात सापडला आरटीआय कार्यकर्त्याचा मृतदेह, आठ दिवसांपासून होते बेपत्ता
दरम्यान, या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी हलगर्जीपणा केला असेल तर त्यांच्यावरही कारवाई होईल तसंच एफआयआरमधील संशयितांची चौकशी केली जाईल, असं आश्वासन पोलीस उपायुक्त बच्चन सिंग यांनी दिलंय.
माहितीच्या अधिकाराखाली विनायक शिरसाट यांनी अवैध बांधकाम प्रकरणं बाहेर काढली होती. त्यावर कारवाई करणं प्रशासनालाही भाग पडलं होतं. त्यामुळे, विनायक शिरसाट यांची हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली? याचं गूढ अद्यापही कायम आहे.