आरटीओच्या ऑनलाईन सेवेचे तीनतेरा, व्यवहार रखडलेत

राज्यभरातील लाखो नागरिकांना आरटीओत खेटे घालावे लागत आहेत. यासंबंधी परीवहन मंत्र्यांनाही पत्र लिहीण्यात आलंय. 

Updated: Dec 20, 2017, 08:27 PM IST
आरटीओच्या ऑनलाईन सेवेचे तीनतेरा, व्यवहार रखडलेत title=

अरुण मेहेत्रे/कपिल राऊत/अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई :  आरटीओत मोठ्या प्रमाणात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी राज्यातील सर्व प्रादेशिक परीवहन विभागात “वाहन ४.०” आणि “सारथी ४.०” या अद्ययावत सॉफ्टवेअरचा वापर सुरू झाला. पण ही प्रणाली वारंवार ठप्प होते आहे. त्यामुळे राज्यभरातील लाखो नागरिकांना आरटीओत खेटे घालावे लागत आहेत. यासंबंधी परीवहन मंत्र्यांनाही पत्र लिहीण्यात आलंय. 

रखडले सगळे व्यवहार

गेल्या ३ नोव्हेंबरपासून विविध प्रादेशिक कार्यालयात ही प्रणाली पूर्णपणे ठप्प आहे. त्यामुळे सगळे ऑनलाईन व्यवहार रखडलेत. ‘वाहन ४.०’ आणि ‘सारथी ४.०’ या प्रणाली अंतर्गत आरटीओतील ४१ प्रकारची कामं ऑनलाइन होतात.  पर्यावरण कर, परमिट, व्यवसाय कर आणि खटला विभागाशी संबंधित दंड या चार सेवा वगळता उर्वरित ४१ सेवांसाठी ऑनलाइन पद्धतीने पैसे भरावे लागतात. नेट कनेक्टिव्हीटी चांगली नसल्याने ई-शुल्क भरताना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे ऑनलाइन व ऑफलाइन या दोन्ही सुविधा सुरू ठेवाव्यात अशी मागणी केली जातेय. 

अधिका-यांचा दावा

बॅंकेच्या सर्व्हरचं काम सुरु असल्याने २-३ दिवस हा त्रास झाला होता. पण आता सर्व व्यवहार सुरळीत असल्याचा दावा आरटीओ अधिकारी करताहेत.

सॉफ्टवेअरच्या फायद्याबाबत शंका

आरटीओत बसवण्यात आलेल्या या नव्या सॉफ्टवेअरमुळे फायदा होतोय यात शंकाच नाही. मात्र ही कार्यप्रणाली सुरळीत सुरू राहावी यासाठी सरकार प्रयत्न करत नाहीये. त्यामुळे डिजीटल इंडियाचं स्वप्न दाखवणारं सरकार स्वतःच्याच व्हीजनला हरताळ फासतंय का असा प्रश्न निर्माण झालाय.